नाशिक : रेल्वेकडून गेल्या काही वर्षांत नाशिकला सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत नाशिक आता अन्याय सहन करणार नाही, असा खणखणीत इशाराच नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना यांना दिला आहे. नवीन स्थानकांचा विकास, रेल्वे ट्रॅक्शन कारखाना, लॉजिस्टिक स्थानक, महत्वाकांक्षी प्रकल्प, नवीन रेल्वेगाड्या, पंचवटी-राज्यराणी, कामांचा दर्जा आदी प्रश्न उपस्थित करताना वाजे यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना यांच्या उपस्थितीत लोकसभा सदस्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी खासदार वाजे यांनी नाशिकच्या प्रश्नांना वाचा फोडली. वाजे यांनी नाशिक-कल्याण लोकल रेल्वे सेवा, मनमाड ते इगतपुरी-कल्याणपर्यंत नवीन रेल्वे ट्रॅक, कसारा बोगदा रुंदीकरण, नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे आदी महत्वपूर्ण विषयांसह नाशिक ट्रॅक्शन कारखाना विस्तारीकरण, नाशिकरोड रेल्वे स्थानकाचा विस्तार व आधुनिकीकरण, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओढा रेल्वे स्थानकाचा न्यू नाशिकरोड रेल्वे स्थानक म्हणून विकास करणे, पाडळी येथे लॉजीस्टिक स्टेशनची उभारणी करणे आदी विषयांसह पंचवटी व राज्यराणी एक्स्प्रेसच्या समस्यांचा पाढा वाचला. तसेच नाशिक ते मुंबई नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली. तसेच, सद्यस्थितीत सुरू असलेले किंवा पूर्णत्वास गेलेल्या रेल्वेच्या अंडरपास व ओव्हरहेड ब्रिजच्या निकृष्ट दर्जामुळे नागरिकांना ज्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्याबाबत देखील खासदार वाजे यांनी संताप व्यक्त केला.
ट्रॅक्शन मशीन कारखाना कामगारांचे प्रश्न मांडताना या प्रकल्पाचा आजतागायत त्याचा पूर्ण क्षमतेने वापर झालेला नाही. याठिकाणी सुमारे 30-40 एकर रिकामी जमीन असून, त्याचा उपयोग लोको शेड व मेमू डिपो उभारणे, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती युनिट सुरू करणे, नवीन यंत्रसामग्रीसाठी उत्पादन युनिट उभारणे या कामासाठी करण्याची मागणी खा. वाजे यांनी केली.
पंचवटी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकातील वारंवार बदल, तांत्रिक बिघाड, वॅगन अदलाबदल आणि स्वच्छतेच्या तक्रारी नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. वाजे यांनी या सेवेच्या दर्जाबाबत संताप व्यक्त करत नियमित देखभाल, दर्जेदार डबे आणि वेळपालन यावर भर देण्याची गरज अधोरेखित केली. तसेच, राज्यराणी एक्स्प्रेस पुन्हा मूळ मार्गावर (नाशिक-मुंबई) कार्यान्वित करावी, अशीही मागणी त्यांनी मांडली.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड स्थानकाचा विस्तार करा, ओढा (न्यू नाशिक रोड) येथे अत्याधुनिक नवीन रेल्वे स्थानक उभारणे, पाडळी येथे लॉजिस्टिक हब व सुकाणू केंद्र उभारणे आदी मागण्या खा. वाजे यांनी केल्या. नव्याने प्रस्तावित असलेल्या ओव्हरहेड ब्रिज आणि अंडरपासचा आराखडा बनवताना स्थानिकांना विश्वासात घेण्याची मागणी त्यांनी केली.