नाशिक : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प रखडल्याने, नाशिक-कल्याण व्हाया पुणे अशा सहा रेल्वे गाड्या सुरू केल्या जाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र चेंबरच्यावतीने जिल्हा उद्योग मित्रच्या बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे करण्यात आली. सध्या पुणे गाठण्यासाठी नाशिककरांना मनमाड, दौंडमार्गे प्रवास करावा लागतो. हा प्रवास करण्यासाठी चार तासांचा अवधी लागत असून, व्हाया कल्याण मार्गे गेल्यास तितकाच चार तासांचा अवधी लागणार असल्याचे चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी सांगितले.
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प भूसंपादनामुळे रखडल्याचे सांगितले जात असले तरी, राजकीय वादाची त्यास किनार आहे. नाशिक-पुणे धावणारी रेल्वे संगमनेर तसेच शिर्डीमार्गे धावावी असा वाद चिघळल्याने, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. दरम्यान, यावर जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत नाशिककरांना पुणे गाठण्यासाठी व्हाया कल्याण सहा रेल्वे सुरू केल्या जाव्यात अशी मागणी महाराष्ट्र चेंबरच्या वतीने यापूर्वीच रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे केली आहे. हीच मागणी सोनवणे यांनी झूम बैठकीत केली.
सध्या नाशिककरांना मनमाड, दौंडमार्गे पुणे गाठावे लागते. यामार्गे जाण्यासाठी एकच लाइन आहे. तुलनेत व्हाया कल्याण रेल्वे सुरू केल्यास, तीन लाइन उपलब्ध आहेत. या मार्गे जाताना देखील चारच तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी सोनवणे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली.
नाशिक-गोवा रेल्वे सुरू करा
छत्रपती संभाजीनगरमार्गे व्हाया नाशिक गोवा रेल्वेसेवा सुरू करण्याचीही मागणी झूम बैठकीत सोनवणे यांनी केली. छत्रपती संभाजीनगर येथून सायंकाळी ५.३० वाजता निघणारी रेल्वे रात्री ८ वाजता नाशिक येथे येईल. तेथून रात्री १० वाजता पनवेलला पोहोचेल. तेथून सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान रत्नागिरी येथे पोहोचणार असून, ९.३० वाजेपर्यंत गोवा येथे असेल. ही रेल्वे सुरू झाल्यास, व्यापार-उद्योगाला चालना मिळेल. याशिवाय पर्यटनही वाढेल. छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथील पर्यटक गोव्याला जातील. तर तेथील पर्यटक नाशिक तसेच संभाजीनगरला येतील, अशी मागणीही सोनवणे यांनी केली.