नाशिक, सतीश डोंगरे
नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची मूळ अलाइन्मेंट रद्द करत अहिल्यानगर - शिर्डीमार्गे नवा रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्यास नाशिक आणि पुण्यातील व्यापार, उद्योग क्षेत्रातून विरोध होत आहे. हा मार्ग वेळखाऊ असून नारायणगाव, खेड भागातील कृषी उत्पादने, कृषी प्रक्रिया उद्योगांशी व्यापार, उद्योगांच्या प्रगतीला ब्रेक लावणारा ठरेल. त्यामुळे जुनाच मार्ग कायम ठेवावा, अशी मागणी व्यापार, उद्योग क्षेत्रातून होत आहे.
बहुप्रतिक्षित २३५ किमीचा नाशिक-पुणे रेल्वेचा मूळ प्रस्तावित मार्ग १६ हजार कोटी रुपये खर्च कीत उभारला जाणार आहे. जुना मार्ग नारायणगाव येथून जात होता. अहिल्यानगरच्या संगमनेर आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमार्गे हा मार्ग असल्याने व्यापार - उद्योगांसाठी सोयीचा होता. या भागातील शेतमालांसह औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांच्या मालाची ने आण करणे सोयीचे होणार होते. याशिवाय नारायणगाव, खेड या भागातील कृषी उत्पादने व कृषी प्रक्रिया उद्याेगांसाठीही या मार्गाचा मोठा फायदा होणार होता.
मात्र, नारायणगावजवळील खोडद येथील ‘जीएमआरटी’ प्रकल्पाजवळून हा मार्ग जाणार असल्याने विज्ञान - तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा विभागाने आक्षेप घेतल्याने तो बदलण्यात आल्याचे सांगितले गेले. रेल्वे लाइनमुळे दुर्बिणीची निरीक्षणे बिघडण्याचा धोका असल्याने नव्या मार्गाचा प्रस्ताव तयार केला गेला. मात्र, प्रत्यक्षात यात राजकीय गंध असल्याने मार्ग बदलास व्यापार, उद्योग क्षेत्रातून विरोध होत आहे. जुना मार्गच कायम ठेवावा, अन्यथा हा प्रकल्प डब्यात जाईल, अशी भितीही व्यक्त केली जात आहे.
जुना मार्ग असा
नाशिकरोड - सिन्नर - संगमनेर - नारायणगाव - खेड, आंबेगाव, जुन्नर तालुकामार्गे - आळंदी - हडपसर - चाकण - पुणे.
नवा मार्ग असा
पुणे - चाकण औद्योगिक वसाहतीमार्गे - अहिल्यानगर - निंबळक - पुणतांबा - पिंपळगाव - शिर्डी - नाशिक.
व्यापार, उद्योगावर असा होणार परिणाम
खेड, नारायण गाव येथील कृषी उत्पादनाची ने आण तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांवर होणार परिणाम
चाकण येथील उद्योगांना नाशिकमधून कच्चा माल पाठवण्यात येणार अडथळे
नाशिकमधून पुण्यात जाणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांसाठी मार्ग गैरसोयीचा
नाशिकमधील उद्योगांचा विस्तार पुण्यात असून, मालाची ने - आण करण्यावर परिणाम
पर्यटक, विद्यार्थी, नोकरदारांसाठी देखील नवा मार्ग ठरणार गैरसोयीचा
जुना मार्ग हा थेट आणि सोयीचा आहे. चाकणची कनेक्टिव्हिटी मिळत असल्याने त्याचा नाशिकच्या उद्योगांना मोठा लाभ होऊ शकला असता. नव्या मार्गामुळे एक तासांचा अधिक प्रवास वाढणार आहे. त्यामुळे कल्याणमार्गे पुण्यासाठी सुरू केलेल्या पॅसेंजरचे प्रवाशांअभावी जे हाल झाले, ते या प्रकल्पाचे होऊ नयेत. म्हणून जुन्याच मार्गाचा विचार करावा.आशिष नहार, अध्यक्ष, निमा.
नव्या मार्गाचा प्रस्ताव निराशाजनक आहे. नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या आयटी नोकरदारांची संख्या अधिक आहे. त्यांच्यासाठी नवा मार्ग अडचणीचा ठरणार आहे. याशिवाय चाकणमधील नाशिकमधून कच्चा माल पाठवताना अडथळे येणार आहेत. त्यामुळे नाशिक - सिन्नर - संगमनेर - पुणे हा कॉरिडॉरच कायम ठेवावा, अशी मागणी करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहोत.ललित बुब, अध्यक्ष, आयमा
नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वेचा जुना मार्ग उद्योगाच्यादृष्टीने योग्य होता. या मार्गासाठी भूसंपादन देखील केले आहे. हायस्पीड टाकण्यासाठी मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या मार्गानेच रेल्वे होणे गरजेचे आहे. दोन तासात जर आपण पुण्यात पोहोचू. त्याठिकाणी फेऱ्याने जाण्यात काही अर्थ नाही. खरे तर नाशिकच्या उद्योग वाढीसाठी चहुबाजुने कनेक्टिव्हिटीची गरज आहे.किशोर राठी, अध्यक्ष, सीमा.
नव्या प्रस्ताविक मार्गामुळे नारायणगाव, खेड या भागातील कृषी उत्पादने व कृषी प्रक्रिया उद्योगांशी संबंधित व्यापार, उद्योगाला ब्रेक मिळू शकतो. याचे नाशिक आणि पुण्यातील उद्योगांवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे. नव्या मार्गाचा नाशिक आणि पुणे येथील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, उद्योजक, पर्यटकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.संजय सोनवणे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर, नाशिक.