भारतीय रेल्वे file photo
नाशिक

Railway News : रेल्वेची ६५३ दशलक्ष टन मालवाहतूक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : भारतीय रेल्वेने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत ६५३ दशलक्ष टन मालवाहतूक केली. मालवाहतुकीत कोळसा, स्टील, धान्य, विविध खनिज, पेट्राेलियम पदार्थ आणि ऑटोमोबाइलचा समावेश आहे. रेल्वेने सन २०३० पर्यंत ३ हजार दशलक्ष टन मालवाहतुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते गाठण्यासाठी रेल्वेकडून नेटवर्कचा विस्तार व कार्यक्षमतावाढीवर भर दिला आहे.

देशांतर्गत रेल्वे साधारणत: ४८ प्रकारचा कोळसा आणि कोक उत्पादने, ५४ प्रकारची खनिजे व धातू, ३७ प्रकारचे अन्नधान्य, पीठ आणि कडधान्ये तसेच २३ प्रकारच्या सिमेंट व क्लिंकर उत्पादनांची वाहतूक करते. याव्यतिरिक्त ४२ प्रकारचे रासायनिक खत, ७५ प्रकारचे लोह व पोलाद उत्पादने, ३९ प्रकारची पेट्रोलियम उत्पादने आणि वायू तसेच ४ प्रकारचे ऑटोमोबाइल उत्पादनांची माल वाहतूक केली जाते. रेल्वेकडून मालवाहतुकीत २१९ प्रकारची उत्पादने हाताळली जातात.

ऑगस्ट महिन्यात रेल्वेने १२६.९७ दशलक्ष टन मालवाहतूक केली. ज्यामुळे २०२४-२५ वर्षासाठी ऑगस्टपर्यंत एकूण ६५३.२२ दशलक्ष टन मालवाहतूक पूर्ण झाली. गेल्या आर्थिक वर्षात याकाळात लोड केलेल्या ६३४.६८ दशलक्ष टनांपेक्षा ही वाढ अधिक आहे. रेल्वेला २०२३-२४ या वर्षात १,५९१ दशलक्ष टन मालवाहतुकीमधून १,६८,२७६ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. पायाभूत सुविधांच्या विकासामुळे रेल्वेला हे शक्य झाले आहे.

पर्यावरणला फायदा

भारतीय रेल्वेद्वारे मालवाहतुकीचा देशाला फायदा होत आहे. रेल्वेच्या मालवाहतुकीचे प्रयत्न हे वाहतुकीचे हरीत आणि ऊर्जा-कार्यक्षम साधन असल्याचे सिद्ध झाले आहे. १ एप्रिल २०२२ पासून ६८ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जनाची बचत झाली आहे. त्याचे प्रमुख कारण रेल्वेगाड्या ८० टक्क्यांपर्यंत कमी कार्बन डाय ऑक्साइड निर्माण करतात. रस्ते मालवाहतुकीच्या तुलनेत ७५ ते ९0 टक्के कमी ऊर्जा वापरतात.

कोळशाचे प्रमाण अधिक

रेल्वेद्वारे वाहतूक केल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंमध्ये कोळसा हा सर्वात महत्त्वाचा आहे. ऑगस्ट २०२४ पर्यंत रेल्वेने ३३३.४० दशलक्ष टन कोळशाची वाहतूक केली. गत आर्थिक वर्षात याच महिन्यात २६६.७१ दशलक्ष टन कोळशाची वाहतूक केली होती. २०२३-२४ वर्षासाठी एकूण कोळसा लोडिंग ७८७.५८ दशलक्ष टन होते. जे २०२२-२३ मध्ये ७२७.९८ दशलक्ष टन इतके वाढले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT