नाशिक : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देताना प्रदीप पेशकार, सुनिल बच्छाव, बापू पिंगळे, नाना शिलेदार, सुनील केदार, विजय साने आदी. pudhari news network
नाशिक

NAMO Bharat Project | नाशिक- मुंबईसाठी 'नमो भारत रॅपिड रेल्वे'

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून असलेली नाशिक- मुंबई लोकलची मागणी ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’नी पूर्ण होणार असून, या नवीन स्वदेशी बनावटीच्या रेल्वेला रेल्वे बोर्डाने मंजूरी दिल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnaw) यांची भेट घेत, लोकल रेल्वेची मागणी केली. त्यास पर्याय म्हणून नमो भारत रॅपिड रेल्वे सुरू केली जाणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले.

लोकलच्या इंजिनचे डिझाइन, डब्यांचा आकार, आवश्यक असलेली गती, कसारा घाटाचे चढण, बोगदा या सर्व तांत्रिक बाबींमुळे नाशिक- कसारा लोकलच्या मार्गात अडथळे येत आहेत. मात्र, नुकतेच भारतीय रेल्वेने वंदे भारत ही संपूर्ण स्वदेशी बनावटीतून 'आत्मनिर्भर भारत' योजनेअंतर्गत तयार केल्याने, नाशिक- मुंबई लोकला पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा उंचावली आहे. त्याचाच आधार घेत, भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत, मुंबई-नाशिक, कल्याण-नाशिक या मार्गावर नमो भारत रॅपिड रेल्वे मंजूर करावी अशी मागणी केली. नमो भारत रॅपिड रेल्वेला १५० किलोमीटर अंतरात चालवण्याची मंजूरी असून, हायस्पीड रेल्वे असल्याने आणि डब्यांचा आकार वंदे भारत एक्सप्रेसप्रमाणे असल्याने नाशिक-मुंबई लोकलबाबतच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करणारा असल्याची बाब रेल्वेमंत्री यांच्या निर्दशनास आणून दिली. त्यावर रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवित लवकरच चाचणी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच ज्या रेल्वे मार्गावर तांत्रिक बाबी उद्भवतात, त्याच मार्गांसाठी नमो भारत रॅपिड रेल्वेची निर्मिती केल्याची त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ही रेल्वे सुरू झाल्यास नाशिककरांना कल्याण, ठाणे, मुंबई व इतर उपनगरांमध्ये कमी वेळात जाणे शक्य होणार आहे. रेल्वे सुखकर व जलद असल्याने नाशिक-मुंबई अंतरही आटोक्यात येईल. दरम्यान चर्चेप्रसंगी भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, बापू पिंगळे, नाना शिलेदार, सुनील केदार, ॲड. श्याम बडोदे आदी उपस्थित होते.

शेतमाल वाहतूकीस लाभ

'नमो भारत रॅपिड रेल्वे' सुरू झाल्यास शेतमालाची वाहतूक व साठवणूक करणे सोयीचे होईल. यासाठी रेल्वेकडून सर्वोत्तपरी मदत केली जाणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. विशेषत: कांदा, द्राक्ष, भाजीपाला यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतकऱ्यांना डायरेक्ट ग्राहक मिळावा यासाठी पार्ट लोड बुकिंगची व्यवस्था सुद्धा करू असे आश्वासनही रेल्वेमंत्र्यांनी दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT