नाशिकजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबई कडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत  Pudhari News Network
नाशिक

नाशिकहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत; लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांबवून...

ओव्हडहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत; मंगला एक्स्प्रेस जात असतांनाची घटना

अंजली राऊत

नाशिक : नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळील देवळाली ते लहवीत स्थानकादरम्यान शुक्रवारी (दि.13) रोजी ओव्हडहेड वायर तुटल्याने नाशिकहून मुंबईकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णत विस्कळीत झाली आहे. 12618 मंगला एक्स्प्रेस तेथून जात असताना ही घटना घडली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने लांब पल्ल्याच्या काही रेल्वेगाड्या थांबविण्यात आल्या आहेत. परिणामी चाकरमान्यांची भिस्त असणारी पंचवटी व राज्यराणी एक्स्प्रेसलाही दोन तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांसह मुंबईला दैनंदिन ये-जा करणाऱ्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले.

रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे शुक्रवारी (दि.13) रोजी पहाटेपासून नाशिकरोड, मनमाड रेल्वे स्थानकांवर प्रवासी ताटकळत होते. रेल्वेचे पथक युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करीत असून लवकरच नाशिक-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक सुरळीत होईल, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. शुक्रवारी (दि.13) रोजी पहाटे साडेचार वाजता देवळाली-लहवीत रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर विपरित परिणाम झाला. अनेक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबवण्यात आल्या. तर रेल्वे अधिकाऱ्यांनी डिझेल इंजिन वापरून मंगला एक्सप्रेस रेल्वे पुढे इगतपुरीकडे नेली. यामुळे तिला एक तास उशीर झाला.

नाशिकरोड रेल्वे स्थानकात ताटकळ असलेल्या गर्दीमध्ये प्रवाशांना मात्र याबाबत कुठलीही माहिती मिळाली नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत होता. शुक्रवारी (दि.13) सकाळी साडेसहा वाजेपासून अनेक प्रवासी राज्यराणी व पंचवटी एक्स्प्रेसच्या प्रतिक्षेत होते. या गाड्यांना आणखी किती उशीर होणार याची कुठलीही माहिती दिली गेली नसल्याची तक्रार करण्यात आली होती.

राज्यराणी आणि मनमाड मुंबई पंचवटी एक्स्प्रेस उशीराने धावताहेत

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर पहाटेपासून अडकलेल्या 12102 ज्ञानेश्वरी एक्स्प्रेससह काही रेल्वे गाड्यांना नाशिकरोडवरून सकाळी साडेसात वाजता प्रवास सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करीत मुंबईहून-नाशिककडे येणान मार्गावरून म्हणजे विरुद्ध मार्गाने अडकलेल्या काही गाड्यांना पुढे नेण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नाशिकरोड स्थानकात हटिया एलटीटी एक्स्प्रेस देखील थांबली होती. याशिवाय 17611 राज्यराणी, 12110 मनमाड मुंबई पंचवटी एक्स्प्रेस आणि या मार्गावर धावणाऱ्या इतर महत्त्वाच्या गाड्या दीड ते दोन तास उशिराने धावत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT