नाशिक : दुर्गदुर्गेश्वर रायगडावरील कथित वाघ्या कुत्र्याची समाधी उखडून दरीत फेकून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मागील आठवडाभरापासून कार्यकर्त्यांवर पाळत ठेवली जात असल्याचा आरोपही ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे साजरा करण्यात आला. प्रारंभी शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच लाडू व पेढ्यांचे वाटप करण्यात आले. दुर्गदुर्गेश्वर रायगड येथे नाशिक येथून मोठ्या प्रमाणात संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते जात असतात. यावर्षीही बरेच कार्यकर्ते दि. ५ जून रोजीच रायगडला रवाना झाले होते. ते तेथील शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी झाले आहेत. वाघ्या कुत्र्याच्या समाधीला संभाजी ब्रिगेडने विरोध केल्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून मागील आठवडाभरापासून पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर पाळत ठेवण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान, शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमप्रसंगी मराठा सेवा संघाचे प्रमोद अहिरराव, संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हिरामण वाघ, किरण मोहिते, शेतकरी चळवळीतील नेते सोपान कडलग, ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख प्रफुल्ल वाघ, उपजिल्हाप्रमुख विकी गायधनी, संघटक नितीन काळे, प्रेम भालेराव आदी उपस्थित होते.
आठवडाभरापासून पोलिस कार्यकर्त्यांवर पाळत ठेवून आहेत. कार्यकर्त्यांना वारंवार फोन करून चौकशी केली जात आहे. मात्र, आम्ही आमच्या उत्सवाला गालबोट लागू देणार नाही. शिवरायांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कथित वाघ्या कुत्रा खरडून काढून दरीत फेकून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत.प्रफुल्ल वाघ, जिल्हाप्रमुख, संभाजी ब्रिगेड, नाशिक.