नाशिक

Rahul Gandhi Congress organization |काँग्रेस संघटन मजबुती हाच राहुल गांधीचा अजेंडा

माणिकराव ठाकरे : दौऱ्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही; प्रशिक्षणातून जिल्हाध्यक्षांच्या संघटनात्मक कामाची दिशा ठरणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नाशिक दौऱ्यामागे कोणताही राजकीय गुप्त अजेंडा नसून, 'संघटन सृजन' अभियानाच्या माध्यमातून पक्षसंघटना बळकट करणे आणि महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर नेते व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे हाच या दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याची स्पष्ट माहिती काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली. नूतन जिल्हाध्यक्षांच्या होत असलेल्या प्रशिक्षण शिबिरातून संघटनात्मक कामाची दिशा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राहुल गांधी यांच्या दौऱ्यानिमित्त ठाकरे नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि संघटनात्मक परिस्थिती जाणून घेण्यासाठी राहुल गांधी यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसोबत तसेच विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. राज्यातील प्रश्न, संघटनेची सद्यस्थिती, कार्यकर्त्यांच्या अडचणी तसेच काँग्रेसच्या विचारधारेनुसार संघटन अधिक मजबूत करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

संघटनात्मक बैठकींसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील लोकांना बोलावण्यात आले होते. जिल्हाध्यक्षांची निवड कशी झाली, त्यामागील प्रक्रिया काय होती, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि संघटनात्मक कामाची दिशा याबाबतही चर्चा करण्यात आली. काँग्रेसची संस्कृती, पक्षाची विचारधारा आणि कार्यकर्त्यांमध्ये परस्पर जवळीक वाढविण्याची गरज यावरही बैठकीत भर देण्यात आला. इतर राज्यांमध्ये 'संघटन सृजन' अभियानाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने काम करण्यात आले, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही संघटनात्मक प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

संघटन महत्त्वाचे पद आणि राजकीय जबाबदाऱ्यांचा काळ मर्यादित असतो; मात्र पक्षाची विचारधारा आणि संघटना दीर्घकाळ टिकणारी असते. त्यामुळे व्यक्तीपेक्षा संघटन आणि विचार महत्त्वाचा असल्याचा संदेश या संपूर्ण प्रक्रियेतून देण्यात येत आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये परस्पर संवाद, जवळीक आणि विश्वास वाढविण्याची आवश्यकता असून, त्यासाठी अशा भेटी महत्त्वपूर्ण ठरतात, असे ठाकरे यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबाशीही संवाद

राहूल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. जिल्हाध्यक्षांना संघटनेचे काम करताना अनेकदा घरापासून दूर राहावे लागते. पक्षासाठी वेळ देताना त्यांच्या कुटुंबाचीही भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. पक्ष म्हणजे केवळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रचना नसून 'काँग्रेस एक घर आहे, विचारांचे घर आहे', या भावनेतून हा संवाद साधण्यात आल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT