नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर शरद पवार यांनी केलेली टीका वैफल्यातून आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला अशा प्रकारची टीका करणे शोभत नाही, असे नमूद करत, शरद पवारांनी बॉम्बस्फोटातील आरोपीला विमानातून आणले होते. मग यावर आम्ही टीका करायची का?, अशा शब्दांत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी पवारांवर पलटवार केला.
भाजपच्या विस्तारित कार्यकारिणी बैठकीनिमित्त शनिवारी (दि. २७) विखे-पाटील नाशिक दौऱ्यावर आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्यावर शरद पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. पवार हे वैफल्यातून टीका करत आहेत. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना अशा प्रकारची टीका करणे शोभत नाही. शरद पवार यांनी बॉम्बस्फोटातील आरोपी विमानातून आणल्याचा आरोप होता. मग यावर आम्ही टीका करायची का, असा सवाल त्यांनी केला. मराठा आरक्षणासंदर्भात चारवेळा मुख्यमंत्री राहूनही शरद पवार यांनी काहीच काम केले नाही. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी काही काम केले असेल तर सांगावे, असे आव्हानही विखे पाटील यांनी दिले. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून राज्यभर फलक लावण्यात आले असून, त्यावर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. यावर विखे-पाटील यांनी ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना, राज्याचा आगामी मुख्यमंत्री जनताच ठरवेल, असे सूचक वक्तव्य केले. लोकसभेला असलेली परिस्थिती विधानसभा निवडणुकांमध्ये राहणार नाही. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येईल. राज्यात 'लाडकी बहीण' योजनेचे जोरदार स्वागत होत असून, योजनेसाठी निधीची चिंता नाही. येत्या काळात महिलांच्या खात्यावर निधी आलेला दिसेल, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.
पाच लाख टन कांद्याची निर्यात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु तेवढा कांदा मिळत नाही. कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. कांद्यावरील निर्यातमूल्य कमी झाले पाहिजे व अधिक कांदा निर्यात झाला पाहिजे. त्यामुळेच कांद्यावरील निर्यातमूल्य कमी करण्यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना विनंती करण्यात आली असल्याची माहिती विखे- पाटील यांनी यावेळी दिली.