Nashik Municipal Corporation to the Purohit Sangh for the demolition of the controversial changing room at Ramkunda is expiring at the end of August.
नाशिक : रामकुंडावरील वादग्रस्त वस्त्रांतरगृहाच्या पाडकामासाठी नाशिक महापालिकेने पुरोहित संघाला बजावलेल्या नोटिसीचा कालावधी आॉगस्टअखेर संपुष्टात येत आहे. त्यामुळे इमारत जमीनदोस्त करण्यासाठी महासभेची मंजुरी घेतली जाणार असून, या पाडकामानंतर भाविकांच्या सुविधेसाठी राम काल पथ प्रकल्पांतर्गत नव्याने वस्त्रांतरगृह उभारले जाणार आहे.
१९९२ मध्ये उभारण्यात आलेली वस्त्रांतरगृहाची इमारत कायम वादात राहिली आहे. ही इमारत गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाला तीन वर्षांसाठी नाममात्र भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. १९९५ मध्ये महापालिका व पुरोहित संघ यांच्यातील करारनामा संपुष्टात आला. मात्र, पुरोहित संघाने वस्त्रांतरगृहाचा ताबा आजतागायत कायम ठेवला आहे.
वस्त्रांतरगृहाची इमारत ताब्यात घेण्यासंदर्भात पुरोहित संघाला नोटीस बजावली असून, नोटिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर महासभेची मंजुरी घेऊन पाडकामाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त, महापालिका. नाशिक.
मध्यंतरी गोदा आरतीवरून पुरोहित संघ आणि रामतीर्थ समितीमध्ये संघर्ष सुरू झाल्यावर वस्त्रांतरगृहाच्या वापराचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयामार्फत पुरोहित संघाला नोटीस बजावून कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. मागील वर्षी वस्त्रांतरगृह ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडे बंदोबस्त मागितला होता. मात्र पोलिसांनी अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये व्यग्र असल्याचे कारण देत तत्काळ मनुष्यबळ ना पुरवल्यामुळे इमारत पाडकामाचा निर्णय लांबणीवर पडला होता. दरम्यान महापालिकेने पुरोहित संघाला बजावलेल्या नोटिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर तत्काळ पाडकामाचा निर्णय होणार आहे. त्यासाठी महासभेची परवानगी घेऊन निविदाप्रक्रिया राबवून इमारत पाडण्याचा ठेका दिला जाणार आहे.