पंचवटी (नाशिक) : पुरोहित संघाचे अध्यक्ष ३८ वर्षांनंतर बदलले असून, नव्याने सभासद नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय संघाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या सभेत माजी अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या विरोधात अनेक तक्रारींचा पाढा वाचण्यात आला, मात्र वादात न अडकता संघाच्या प्रगतीच्या दृष्टीने काम झाले पाहिजे, पुरोहित संघाची स्वतःची धर्मशाळा हवी अशी मागणी सदस्यांनी या सभेत केली.
पुरोहित संघाची सर्वसाधारण सभा शौनकाश्रम येथे शुक्रवारी (दि. १८) पार पडली. या सभेत अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर पंचाक्षरी यांना सर्व सदस्यांनी हात उंचावून एकमुखाने पाठिंबा जाहीर केला. सतीश शुक्ल हे वस्त्रांतर गृह आणि पुरोहित संघाचे कार्यालय वैयक्तिक मालमत्ता असल्यासारखे वापरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात पुरोहित संघाच्या स्वतःच्या मालमत्तेत कोणतीही वाढ झाली नाही, असा आरोप सदस्यांनी केला. तसेच सीएसआर फंडातून कोणताही निधी आणला गेला नाही. संस्थेची स्वतःची पाठशाळा नसल्याची खंतही यावेळी उपस्थित करण्यात आली. पुरोहित संघाच्या वस्त्रांतर गृहाचा वापर पावसाळ्यात पुराचे पाणी आल्यावर कर्मकांडासाठी केला जातो परंतु यासाठी संघाची मोठ्या रकमेची पावती फाडावी लागते, यावरही सदस्यांनी आक्षेप घेतला.
यावेळी शेखर शुक्ल, प्रमोद दीक्षित, महेश शुक्ल, नितीन पाराशरे, सुनील गर्गे, मंदार शिंगणे, विनायक पाराशरे या सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. व्यासपीठावर सचिव वैभव दीक्षित, अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, उपाध्यक्ष शेखर शुक्ल, सहखजिनदार दिनेश शास्त्री गायधनी आणि प्रवक्ते शांताराम शास्त्री भानोसे उपस्थित होते.
अध्यक्ष नियुक्तीचा विषय धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित असताना अशा प्रकारची सभा घेता येत नाही. त्यामुळे ती बेकायदेशीर आहे व नव्याने सभासद नोंदणीला कुठलाही कायदेशीर आधार नाही.सतीश शुक्ल, अध्यक्ष, पुरोहित संघ, नाशिक.
आमचा कारभार कायदेशीर असून, घेण्यात आलेल्या दोन्ही सभा व त्यात करण्यात आलेली अध्यक्ष व कार्यकारिणी निवड कायदेशीर असून, सर्वाधिक सभासदांनी सर्वानुमते केलेली आहे.चंद्रशेखर पंचाक्षरी, नवनियुक्त अध्यक्ष, पुरोहित संघ