नाशिक : गोदाघाटावरील रामकुंडालगतच्या वस्त्रांतरगृहाच्या पाडकामास श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाने विरोध दर्शविला आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने आधी नवीन वस्त्रांतरगृहाची उभारणी करावी. त्यानंतरच जुन्या वस्त्रांतरगृहाची इमारत पाडावी, अशी भूमिका पुरोहित संघाने महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्यापुढे मांडली आहे. इतकेच नव्हे तर, महत्वाकांक्षी 'राम काल पथ' प्रकल्पाच्या उभारणीतही विश्वासात घेण्याची मागणी पुरोहित संघाने केली आहे.
श्री गंगा गोदावरी पंचकोठी(पुरोहित संघा)च्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि.६) आयुक्त खत्री यांची भेट घेत निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, वंशपरंपरेने आमची ३५० कुटुंब हजारो वर्षांपासून धार्मिक विधी, गंगा गोदावरी जन्मोत्सव, गोदावरी महाआरती, त्रिकाल नैवेद्य तसेच सिंहस्थ कुंभ स्नानाच्या तारखा, कुंभध्वजारोहण ते ध्वजावतरणाची सर्व व्यवस्था पुरोहित संघ अनादी काळापासून करत आहे. रामकुंडावर येणारे भाविक, साधुसंत व प्रशासन यामधील मुख्य दुवा पुरोहित संघ आहे. यासाठी येथील सुव्यवस्था व पावित्र्य जपणे, भाविकांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी दरमहा पुरोहित संघ आणि महापालिका यांची संयुक्त समन्वय बैठक आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
गोदावरीत वाहते निर्मलजल राहील, अशी व्यवस्था करावी, गोदाघाटावरील भिकारी, भटक्यांचा बंदोबस्त करावा. भाविकांसाठी निवाराशेडची उभारणी करावी. पिण्याचे पाणी, शौचालयांची व्यवस्था करावी. गोदाघाट परिसरात मांस, मासळी तसेच मद्यविक्री बंद करावी, सिंहस्थ काळात धार्मिक विधी, काकस्पर्शासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. दिशादर्शक फलक, धर्मशाळा, रामकुंड व लक्ष्मणकुंडाची दर आठवड्याला स्वच्छता करावी आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. निवेदनावर सतीश शुक्ल, दिलीप शुक्ल, मनोज गायधनी, शाम नाचण, प्रफुल्ल गायधनी, अजित गर्गे, बालाजी गायधनी, बंधुजी पाराशरे, सुहास शुक्ल आदींची नावे आहेत.