नाशिक : आगामी सिंहस्थ-कुंभमेळ्यात पुरोहित संघ आणि पोलिस यांच्यात समन्वयाची भूमिका ठेवून कामे केली जाणार असल्याचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केले आहे. श्रीगंगा गोदावरी पंचकोटी पुरोहत संघाबरोबर नुकतीच पोलिस आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत समन्वय बैठक पार पडली. बैठकीत आयुक्त कर्णिक यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
बैठकीत तीर्थावर तसेच सिंहस्थ काळात येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा कशा देता येती, त्याबाबतचे नियोजन कसे करता येईल व गोदावरी प्रेमींना त कसे सुखावह ठरेल, सिंहस्थ निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, याबाबतही बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी पुरोहित संघाच्या सदस्यांनी केलेल्या सूचना आयुक्त कर्णिक यांनी जाणून घेतल्या.Purohit Sangh Nashik
तसेच काही मुद्यांचे निरसनही केले. सिंहस्थ-कुंभमेळा काळात कायदा व सुव्यवस्थेची योग्य काळजी घेतली जाणार असल्याचे आश्वासनही कर्णिक यांनी दिले. बैठकीत अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, उपाध्यक्ष वेदमूर्ती शेखर शुक्ल, नितीन पाराशरे व निखिल देव, संघटक धनंजय बेळे, कोषाध्यक्ष वैभव क्षेमकल्याणी, चैतन्य गायधनी, अमित पंचभैये, अमित गायधनी, सदानंद देव, राहुल अगस्ते, उपेंद्र देव, सौरभ गायधनी, मंदार देव, माणिक शिंगणे यांच्यासह पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके आदी उपस्थित होते.