नाशिक : गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या अध्यक्षपदावरून झालेल्या वादामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी सातसदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वांशी चर्चेतून कार्यकारिणीस विश्वासात घेऊन सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल, असे समन्वय बैठकीत निश्चित करण्यात आले. दरम्यान, पुरोहित संघाच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर पंचाक्षरी, तर सिंहस्थ समिती अध्यक्षपदी सतीश शुक्ल यांची नियुक्ती करून या वादावर तोडगा काढला जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
येथील गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघामध्ये काही गैरसमजुती व तात्त्विक मुद्दयांवरून निर्माण झालेले मतांतरे व विसंवाद आणखी वाढत जाऊन त्याचा परिणाम पुरोहित संघाच्या एकंदरीत कार्यावर तसेच समाजामध्ये व येऊ घातलेल्या सिंहस्थ सोहळ्यावर होऊ नये, याकरिता समन्वयाच्या दृष्टीने पाऊल टाकणे गरजेचे आहे, या मतावर सर्व पुरोहितांचे व ब्राह्मण समाजातील मान्यवरांचे एकमत झाले आहे. या अनुषंगाने ज्ञाती समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या सूचना, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना व अपेक्षा, समाजातील विविध घटकांच्या अपेक्षांचा सर्वांगाने विचार करून सर्व पुरोहितांनी व पुरोहित संघाने सर्वांना सोबत घेऊन एकीने कार्य करण्याचा संकल्प सोडला आहे. या अनुषंगाने आगामी काळात कार्यरत राहण्यासाठी समाजातील मान्यवरांच्या अंतर्गत समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय शनिवारी (दि. ९) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या समन्वय समितीमध्ये सात ब्रह्मवृंदांच्या प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. समितीमार्फत सर्वांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी संवाद साधत झालेला निर्णय हा एकत्रित नूतन कार्यकारिणीसमोर ठेवला जाईल. या कार्यकारिणीस विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
वे. स्मार्त चुडामणी शांतारामशास्त्री भानोसे, किशोर उपाख्य बाळासाहेब गायधनी, सुधीर पैठणकर, उदयन दीक्षित, सोमनाथ बेळे, चंद्रशेखर गायधनी, हेमंत तळाजिया.