नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'पुढारी' समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर, कुंभमेळामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विकासाचा वेध घेणाऱ्या या विशेष उपक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा 'नाशिक आयकॉन' पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. तसेच आरोग्यसेवा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना 'आरोग्यरत्न सन्मान' प्रदान करण्यात येणार आहे.
'पुढारी'च्या या विशेष सोहळ्यात नाशिकच्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करण्यासोबतच सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाची दिशा, पायाभूत सुविधांची उभारणी, भाविकांसाठीच्या सुविधा आणि प्रशासनाच्या तयारीवरही प्रकाश टाकण्यात येणार आहे.
'नाशिक आयकॉन' आणि 'आरोग्यरत्न सन्मान' यांच्या माध्यमातून नाशिकच्या सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव केला जाणार आहे. हा सोहळा केवळ निमंत्रितांसाठी असणार आहे.
दिनांक : शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६
वेळ : सायंकाळी ५ वाजता
स्थळ : हॉटेल ट्रीट, मनोहर गार्डन, गोविंदनगर, नाशिक