नाशिक

पुढारी विशेष | पाल्याला 'सर्वोत्तम' घडवताना पालकच 'डिप्रेशन'चे शिकार

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : निल कुलकर्णी

स्पर्धेच्या युगात आपले पाल्य अष्टपैलू, सर्वच क्षेत्रात ’सर्वोत्तम’, परीपूर्ण व्हावे, असा पालकांचा अट्टहास असतो. त्यातून पालकच उदासिनतेचे शिकार होत असल्याचे वास्तव एका अभ्यासातून समोर आले आहे. (A study has revealed the fact that parents are victims of depression)

पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात. त्याचाच विपरित परिणाम पालकांवर होत असल्याचे एका सर्वक्षणातून समोर आले. पालक या अपेक्षांमुळे ’डिप्रेशन’, ’स्ट्रेस’चे शिकार होत आहेत. पालक मानसिक पातळीवर अती दडपणाखाली जात आहेत, या अभ्यासातून पूढे आले.

ओहायो विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनात 700 हून अधिक पालकांनी सहभाग घेतला. मुलांना घडवण्याच्या त्यांना अष्टपैलू करण्याच्या प्रयत्नात अत्यंत नैराश्य येते, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 57 टक्के पालकांनी नमूद केले. मुलांकडून पालकांच्या घरातील, समाजातील, शाळेतील तसेच सर्वच स्तरातील अपेक्षांबद्दल आपण कमालिचे असमाधानी आहोत. यातून सतत अनामिक चिंता सतावते असेही पालकांनी नमूद केले. आपल्या देशातील पालकांची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही, असे निरीक्षण समाजअभ्यासकांनी नोंदवले.

हल्ली पालक आपल्या मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच जिमनॅस्टिक, चित्रकला, नृत्य, गायन क्लास, खेळ प्रशिक्षण आदी गोष्टींमध्ये परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अभ्यासासोबतच मुलांना ’एक्ट्रा करीक्यूलर’ उपक्रम, कौशल्ये शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. असे करणारे पालकांच्या वृत्तीत नैराश्य, चिडचिडेपणा, न्यूनगंड वाढवणारे विचार आदी मानसिक समस्या निर्माण होत आहेत, असे अभ्यासांती दिसून आले. पाल्यांना परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात, पालकांवर प्रचंड प्रमाणात मानसिक ताण, दबाव येतो. त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतोच शिवाय अनेक मनोकायिक आजारांही (सायकोसोमॅटीक) त्यांना जडत आहेत. हे टाळण्यासाठी पालकांनी मुलांच्या त्यांच्या सोईने, क्षमतांचा विचार करुन, आवडीचे शिक्षण, कला, कौशल्य द्यावे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. परिपूर्ण पालकत्वाच्या मानकांनुसार जगण्याचा प्रयत्न केल्याने लोक मानसिकरित्या कमजोर होऊन, उदासिनतेचे शिकार होऊ शकतात, असे मत या क्षेत्रात संशोधन करणार्‍या तज्ज्ञांनी नोंदवले.

सोशल मीडिया, टीव्ही रिअ‍ॅलिटी शो, डान्स शो, आदीच्या प्रभावाने पालक आपल्या मुलांना अष्टपैलू करण्यासाठी धडपडतात. आपल्या पाल्याने इतर मुलांप्रमाणेच सर्वगुण संपन्न, अष्टपैलू असावे, अशी अपेक्षा व ती पूर्ण न झाल्यास आपले पाल्य स्पर्धेतून बाहेर पडेल, त्याचे भविष्य संकटात जाईल, अशी पालकांची भीति घरोघरी दिसते. मुलांनाही याचे प्रचंड दडपण येते तर पालकांनाही थकवा, अपेक्षापूर्तीसाठी दगदग, चिडचिडेपणा वाढतो. हे सर्व नैराश्यकडे नेणारेच.!
डॉ. अपर्णा चव्हाण, मानसशास्त्रज्ञ, पुणे
व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच तितक्याच विभिन्न आवडीनिवडी अन् कल हे सत्य, पालकांनी समजून घ्यावे. प्राप्त परिस्थितीत कुठले बदल शक्य किंवा आवाक्याबाहेर आहेत हे समजण्याचा ’सुज्ञ’पणा पालकांनी ठेवावा. मुले बहुगूणी, अष्टपैलू होण्यासाठी प्रयत्न जरूर करावेत, पण तसे होण्याचा अट्ट्हास घातकच! अवाजवी, अनाठायी अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये. त्यातून पाल्य अन् पालकही नैराश्याचे शिकार होतील. पालकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही
डॉ. महेश भिरुड, मानसोपचार तज्ज्ञ, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT