नाशिक : गौरव अहिरे
पोलिस ठाण्यांमध्ये दाखल नोंदींनुसार नाशिक शहरासह परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांतून ८ हजार ४२१ नागरिकांनी घर सोडल्याचे उघडकीस आले आहे. १ जानेवारी ते २२ सप्टेंबर 2024 या कालावधीत या नोंदी झाल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता होणाऱ्यांमध्ये ५९ टक्के प्रमाण तरुणी, महिलांचे आहे. कौटुंबिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रेमप्रकरण, बेरोजगारी या कारणांमुळे नागरिक घर सोडत असल्याचे उघड झाले आहे.
खासगी व सार्वजनिक आयुष्यात अनेकांना अडीअडचणी, संकटे, नाराजीचे प्रसंग येतात. त्यामुळे नैराश्य, संताप या भावनेतून किंवा हताश होऊन अनेक जण बेपत्ता होण्याचा विचार करतात. त्यानुसार नाशिक शहरात चालू वर्षात १ हजार ३१० नागरिकांनी कोणालाही न सांगता घर सोडल्याचे उघड झाले. त्यात ७१८ महिला, तरुणींचा समावेश आढळून आला. परिक्षेत्रात अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक २ हजार ५६७ नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद पोलिस ठाण्यांमध्ये असून, त्यात १ हजार ४७५ महिला, तरुणींचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक असून ते तपास करतात. त्यानुसार बेपत्ता झालेल्यांपैकी अनेक जण घरी परतल्याने किंवा त्यांचा शोध लागल्याने ते परतल्याची नोंदी पोलिसांनी ठेवल्या आहेत, तर बहुतांश वेळी बेपत्ता व्यक्ती परतल्यानंतर नातलगांकडून त्याची माहिती पोलिसांकडे दिली जात नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे ती व्यक्ती कागदोपत्री बेपत्ताच असते.
नाशिक शहर १,३१० (७१८)
नाशिक ग्रामीण १,८९८ (१,१९२)
धुळे ७९९ (४८५)
जळगाव १,४७१ (८९८)
अहमदनगर २,५६७ (१,४७५)
नंदुरबार ३७६ (२३०)
काही घटनांमध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तींसमवेत घातपातही झालेले आहेत. त्यात खून करणे किंवा अपहरण करणे, अपघातात मृत्यू होणे असे प्रकार घडले आहेत. या गुन्ह्यांचा शोध घेताना बेपत्ता व्यक्तीचा शोध लागल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत, तर काही प्रकरणांमध्ये बेपत्ता व्यक्तींनी आत्महत्या केल्याचेही उघड झाले आहे.
अचानक घर सोडून जाण्यासाठी प्रमुख कारणांपैकी मानसिक आजार जसे की, नैराश्य किंवा स्किझोफ्रेनिया हे असू शकते. या व्यतिरिक्त स्वभाव दोष हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. याबरोबरच विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी गेलेली व्यक्तीही असे निर्णय घेऊ शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये कमी होत चाललेला संवाद हेदेखील एक कारण आहे. जिथे कुटुंबामध्ये संवाद कमी आहे, तिथे बाहेरच्या क्षणिक मोहाला भुलून, चुकीच्या प्रलोभनांना बळी पडून काही माणसे घर सोडतात.डॉ. नीलेश जेजूरकर, मानसोपचारतज्ज्ञ, नाशिक.