कामगार हा औद्योगिक सुरक्षेमध्ये केंद्रबिंदू असून, त्याची सुरक्षितता मात्र वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. file photo
नाशिक

पुढारी विशेष: कुणी हात, तर कुणी पाय गमावले; कंपन्यांनी वाऱ्यावर सोडले

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : सतीश डोंगरे

उत्पादन प्रक्रियेत सिंहाचा वाटा उचलणारा कामगार हा औद्योगिक सुरक्षेमध्ये केंद्रबिंदू असून, त्याची सुरक्षितता एक दिवसाची नसून, ३६५ दिवस अन् २४ तास असायला हवी. परंतु, दुर्दैवाने हजारो कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी विनाप्रशिक्षण मोठमोठ्या मशीन्सवर काम करण्याचे धाडस करतात अन् कायमस्वरूपी अपंगत्व पत्करतात. जिल्ह्यात चार हजारांहून अधिक असे कामगार आहेत, ज्यातील कोणी हात, तर कोणी पाय गमावले आहेत. कंपन्यांच्या दृष्टीने हे कामगार विनाकामाचे झाले असून, त्यांना बाहेरचा रस्ता दाखविल्याने या कामगारांची दोन वेळेच्या जेवणाचीदेखील पंचाईत झालेली आहे.

जिल्ह्यात मागील काही वर्षांत कारखान्यांमध्ये कामगारांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कंत्राटी स्वरूपात कामगारांची भरती करायची अन् त्यांना वाटेल त्या कामाला जुंपायचे असे 'उद्योग' सुरू असल्यामुळे अनेक कामगारांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात अपंगत्व आलेल्या कामगारांची संख्या चार हजारांहून अधिक असून, त्यातील तीन हजार कामगार कंत्राटी, तर एक हजार कामगार कायमस्वरूपी आहेत. कायमस्वरूपी कामगारांना व्यवस्थापनाने पेन्शनसह इतर मोबदला दिला असला, तरी कंत्राटी कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून हे कामगार हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढत आहेत.

कंत्राटी कामगार जायबंदी होत असतील, तर त्याने थेट न्यायालयात धाव घ्यावी. बऱ्याचदा कामगारांना कंपनी व्यवस्थापनासोबत तडजोड व्हावी अशी अपेक्षा असते. मात्र, त्यात फारसे निष्पन्न होत नाही. झाले, तरी कामगाराच्या भवितव्यासाठी ते पुरेसे नसते, अशात कामगारांनी न्यायालयात धाव घेऊन आपले हक्क मिळवावेत. कायदे कामगारांच्या बाजूने आहेत.
विकास माळी, कामगार उपायुक्त, नाशिक.

कायदा काय सांगतो...

११९५ च्या डिसॲबिलिटीज् ॲक्टच्या कलम ४७ मध्ये स्पष्ट निर्देशांनुसार, अपंगत्व आलेल्या कामगाराला मालकाने नोकरीतून काढून टाकता कामा नये किंवा त्याचा दर्जा कमी करता कामा नये. अशा कामगाराला त्याच्या नेहमीच्या हुद्द्यावर ठेवता येण्यासारखे नसेल, तर त्याला त्याच पगार व नोकरीवर कायम ठेवून दुसऱ्या हुद्द्यावर नेमावे.

जिल्ह्यात चार हजारांहून अधिक कामगार काम करताना जायबंदी झाले. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने या कामगारांना घरचा रस्ता दाखविला. ईएसआयसी, कामगार उपायुक्तालय आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात मिलीभगत असल्याने, या कामगारांचा आवाज कोणीही ऐकत नाही. अनेकांचे दोन वेळेच्या जेवणाचे वांदे आहेत. मी या लोकांना सोबत घेऊन लढत आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे.
कैलास मोरे, अध्यक्ष, दुर्घटनाग्रस्त कामगार संघटना, नाशिक.

भ्रष्ट यंत्रणेचा फटका

कामगार जायबंदी झाल्यास त्याला ईएसआयसीचे पेन्शन लागू होऊ नये म्हणून कंपनी व्यवस्थापनाकडून चलाखीने कागदपत्रांची फेरफार केली जाते. अनेकांच्या पगारातून ईएसआयसीची रक्कम कपात केल्याचे दाखविले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र, ते पैसे ईएसआयसीला भरले जात नसल्याने कामगारांना पुढील लाभ मिळत नाहीत. कामगार उपायुक्तालयातही कामगारांना दाद दिली जात नसल्याचा कामगारांचा आरोप आहे.

जायबंदी कामगारांचे बोल... काम करीत असताना मशीनमध्ये हात गेला अन् हाताचा चुराडा झाला. एका हाताने अपंग झाल्याने, कंपनी व्यवस्थापनाने सहानुभूती न दाखविता उलट कामावरून कमी केले. कुटुंबाचा भार माझ्यावर असल्याने जगावे कसे असा प्रश्न आहे.
कल्पना निकम, अपघातग्रस्त कामगार, नाशिक.

अनेकांचे संसार मोडले

ऐन तारुण्यात अपंगत्व आल्यामुळे अनेक कामगारांचे संसार मोडले. एकट्याच्या कमाईवर घर चालायचे, आता तोच घरात बसला, तर घर कसे चालणार या विचारातून अनेकांच्या पत्नींनी नांदायला येणे टाळले. एका कामगाराची पत्नी डिलिव्हरीसाठी माहेरी गेली अन् त्याच दिवशी त्या कामगाराचे दोन्ही हात शरीरावेगळे झाल्याने, त्याचा संसार टिकणे अवघड झाले आहे.

२०१७ साली कंपनीत काम करीत असताना अचानक आगीने घेरले. त्यात पायापासून ते कमरेपर्यंत भाजलो. सुदैवाने वाचलो. मात्र, न्यायासाठी रोज मरावे लागत आहे. कंपनीने वाऱ्यावर सोडल्यामुळे, लढा देतोय, पण हिंमत खचत आहे.
राजेंद्र पाटील, अपघातग्रस्त कामगार, नाशिक.

सुरक्षित उपकरणांचा अभाव

काम करताना हाताची बोटे तुटणे, पाय तुटणे, डोक्याला गंभीर इजा, भाजणे, अपघाती मृत्यू, व्यवसायजन्य आजार, किरकोळ अपघात टाळण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांना सुरक्षित उपकरणे देणे अपेक्षित असते. त्यामध्ये मास्क, हेल्मेट, सेफ्टी शूज, गमबूट, गॉगल, हातमोजे, सेफ्टी बेल्ट, सुरक्षा पोशाख, कृत्रिम श्वासोच्छवास यंत्र, वेल्डिंग सेफ्टी ग्लास, गॅस डिटेक्टर, वायुगळती सुरक्षा यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा आदी. मात्र, बहुतांश कारखान्यांमध्ये अशी साधनेच दिली जात नसल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे.

सात वर्षांपूर्वी काम करत असताना डावा हात मशीनमध्ये आल्याने, शरीरापासून वेगळा झाला. मात्र, कंपनी प्रशासनाने कुठल्याही स्वरूपाचा मोबदला न देता वाऱ्यावर सोडले. सध्या न्यायालयीन लढा देत आहे.
सागर पाटील, अपघातग्रस्त कामगार, नाशिक.
तब्बल 500 किलो वजनाची प्लेट पायावर पडली अन् पायाचा भुगा झाला. एका पायाने अपंग झाल्यामुळे कंपनीने सहानुभूती दाखवली नाही. कोणताही मोबदला न देता कामावरून कमी केले. आता लढा देत आहे.
गोरखनाथ सोनवणे, अपघातग्रस्त कामगार, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT