हरसूल (नाशिक) : ग्रामीण आदिवासी भागात शिक्षण आणि तद्नुषंगिक आरोग्यविषयक ज्ञानाचा अभाव लक्षात घेता अनारोग्याचा वाढता आलेख चिंताजनक आहे. ही बाब लक्षात घेत प्रशासकीय यंत्रणांच्या जोडीला सामाजिक भान राखणाऱ्या व्यवस्थांनी आरोग्याचा जागर करणे अपरिहार्य आहे. याचाच भाग म्हणून अग्रगण्य दैनिक पुढारी, बॉन्झर लेन्सेस आणि जिल्हा ग्रामविकास यंत्रणेच्या उमेदद्वारा आदिवासीबहुल हरसूल (ता. पेठ ) येथे महिलांना संयुक्त उपक्रम सॅनिटरी किट वाटप आणि आरोग्य संवाद उपक्रम घेण्यात आला.
डॉ. मृणाल कापडणीस म्हणाल्या...
मासिक पाळी म्हणजे गर्भाशय गर्भधारणेसाठी तयार होण्याची प्रक्रिया
मासिक पाळीतील स्वच्छतेसाठी साधे कापड वापरणे धाेक्याचे
या काळात सॅनिटरी पॅडस् वापरणे सुरक्षित असते
पोषक आहार, पुरेसे जलप्राशन, स्वच्छता ही त्रिसूत्री अंगीकारावी
दररोज अंघोळ, फळे-भाज्यांसह कॅल्शियमयुक्त आहार गरजेचा
हरसूल ग्रामपंचायत सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सुमारे 100 महिलांना सॅनिटरी किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर, दै. 'पुढारी'चे निवासी संपादक मिलिंद सजगुरे, युनिट हेड राजेश पाटील, बॉन्झर लेन्सेसचे संचालक मोहित ओचानी आणि कोमल ओचानी, सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. मृणाल कापडणीस, डॉ. लोमेश कापडणीस, उमेदचे स्थानिक समन्वयक राम खंदारे आदी उपस्थित होते.
आपल्या मनोगतात माळेकर म्हणाल्या, आदिवासी महिलांनी आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे अपरिहार्य आहे. याबाबत सरकारी यंत्रणा सजग असल्या, तरी वैयक्तिक जाणिवेतून स्वत:साठी वेळ काढत सकस भोजन, व्यायाम आणि सकारात्मक विचारातून कुटुंब घडवणे गरजेचे आहे. फारसे शिक्षित नसल्याचा तसेच ग्रामीण भागात वास्तव्यास असल्याचा न्यूूनगंड न ठेवण्याचे आवाहन करताना माळेकर यांनी दै. 'पुढारी' आणि बॉन्झर लेन्सेसच्या उपक्रमाला उमेदची जोड देण्याच्या प्रयत्नाची प्रशंसा केली.
बॉन्झर लेन्सेसचे संचालक मोहित ओचानी म्हणाले, व्यावसायिक हित जपताना सामाजिक बांधिलकी हे प्रमाण मानून आदिवासी भागातील महिलांसाठी खारीचा वाटा म्हणून आम्ही सहकार्याचे पाऊल उचलले आहे. उपेक्षित घटकांना मदत करण्याचा आमचा प्रारंभीपासून दृष्टिकोन राहिला असून, भविष्यात हा प्रवास अव्याहत सुरू ठेवण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
समाज प्रबोधन आणि सामाजिक उपक्रम या 'पुढारी' समूहासाठी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगत निवासी संपादक मिलिंद सजगुरे यांनी नाशिक जिल्ह्यातील वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका विशद केली. आदिवासी भागातील समस्यांना वाचा फोडून प्रशासनाला त्या सोडवण्यासाठी उद्युक्त करण्यात 'पुढारी' सातत्याने अग्रेसर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात 100 आदिवासी महिलांना वर्षभर पुरतील अशा प्रमाणात सॅनिटरी किट वाटप करण्यात आले. 'पुढारी'चे युनिट हेड राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर उमेदचे स्थानिक समन्वयक राम खंदारे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी 'पुढारी'चे जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब वाजे, वितरण व्यवस्थापक शरद धनवटे, सहायक व्यवस्थापक महेश अमृतकर, सतीश रकिबे,बॉन्झर लेन्सेसच्या रोहिणी वाकचौरे यांंनी प्रयत्न केले.
या कार्यक्रमांतर्गत डॉ. मृणाल कापडणीस यांनी महिलांना मार्गदर्शन केले. मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून, वयाच्या विशिष्ट स्तरावर तिचा उद्भव होतो. मात्र, त्यामुळे बावरून न जाता त्याबाबतची माहिती घेऊन सामोरे जाण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. मासिक पाळीत अनियमितता असल्यास तज्ज्ञांचा सल्लामसलत करण्याबाबतही त्यांनी सल्ला दिला.