महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत राज्यभरातील महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' राबविणाऱ्या महायुती सरकारने या योजनेतील लाभार्थी महिलांचे एक लाख नवे बचतगट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना यासंदर्भात उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत या बचतगटांची निर्मिती केली जाणार असून, नाशिक जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींवर एकूण ४९१० बचतगटांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट सोपविण्यात आले आहेत.
राज्यात सद्यस्थितीत ७.५० लाखांपेक्षा जास्त बचतगट
यात सहा लाखांवर बचत गट ग्रामीण भागातील
नागरी भागातील बचतगटांची संख्या १.१३ लाखांवर
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नव्या बचत गटांची निर्मिती
महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी शासनाच्या विविध विभागांमार्फत प्रयत्न केले जात असून, याअंतर्गत नगर विकास विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालविकास विभाग आदी विभागांमार्फत महिला स्वयंसहायता बचत गटांची मोठ्या प्रमाणावर स्थापना करण्यात आली आहे. आजमितीस राज्यभरात सुमारे ७.५० लाखांपेक्षा जास्त महिला बचतगट कार्यरत आहेत. यामधील साधारण ६ लाख बचत गट हे ग्रामीण भागामधील उमेद अर्थात राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत स्थापन केलेले आहेत. शहरी भागांमध्ये १.१३ लाख बचतगट हे राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत स्थापन केलेले आहेत, तर उर्वरित बचतगट 'माविम' व इतर संस्थांकडून ग्रामीण भागामध्ये स्थापन करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून आर्थिक सहाय्य प्राप्त झालेल्या महिलांचे बचतगट बनविण्यात यावेत. त्याअनुषंगाने वस्तीस्तरीय संघाची स्थापना करण्यात यावी, अशा सूचना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आयुक्त तथा राज्य अभियान संचालक मनोज रानडे यांनी दिल्या आहेत. स्वयंसहायता बचतगटांची स्थापना ही मिशन मोड पद्धतीने केली जाणार असून, यासाठी डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
राज्यातील शहरांच्या लोकसंख्येच्या आधारे सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना एकूण एक लाख बचतगटांचे उद्दिष्ट विभागून देण्यात आले आहे. यात नाशिक महापालिका क्षेत्रात ३०११, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात ९५४ बचतगट स्थापन केले जाणार आहेत.
नाशिक - ३०११
मालेगाव - ९५४
अहमदनगर- ७११
कोल्हापूर- १११२
बृहन्मुंबई- २५२६९
नागपूर- ४८७१
पुणे- ६३०९
पिंपरी-चिंचवड- ३५०२
ठाणे- ३६८३
वसई-विरार-२४७३
सोलापूर-१९२६
भिवंडी- १४४०
कल्याण २५२४
मीरा-भायंदर- १६५०
नवी मुंबई- २२६७
उल्हासनगर- १०२७
अकोला- ८६५
अमरावती- १३१०
पनवेल-१०३१
सांगली-मिरज-कुपवाड- १०१८
छत्रपती संभाजीनगर- २३७२
धाराशिव- २२७
बीड- २९६
चंद्रपूर- ६५०
धुळे- ७६२
गोंदिया- २६९
परभणी-६२२
जळगाव-९३२
नंदुरबार- २२५
जालना- ५७८
नांदेड- १११५
इचलकरंजी- ५८२ आदी.