Pudhari News Journalist Attack Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर : पुढारी न्यूजचे पत्रकार किरण ताजणे यांच्यावर त्र्यंबकेश्वर इथं हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात किरण ताजणे यांना काही गंभीर दुखापती झाल्या आहेत. ही घटना स्वामी समर्थ केंद्राजवळ घडली. प्रवासी गाड्यांच्या पावत्या फाडणाऱ्या गुंडांनी हा हल्ला केल्याचं पुढारीचे पत्रकार किरण ताजणे यांनी सांगितलं. त्यांनी या गुंडांनी तीन ते चार पत्रकारांवर हल्ला केल्याचं देखील सांगितलं. दरम्यान, जखमी पत्रकारांवर सध्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत झी २४ तासचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'त्रंब्यकेश्वर मध्ये प्रवेश करण्यासाठी काही फी आकारली जाते. ही फी पर्यटकांकडून वसूल केली जाते. या वसूलीसाठी काही मुलं ठेवली आहेत. आम्ही साधू महंतांची एक बैठक होती. ती कव्हर करण्यासाठी आम्ही जात असताना या लोकांनी आमच्या गाड्या आडवल्या आणि आमच्यावर हल्ला केला.'
योगेश खरे पुढं म्हणाले की, 'आम्ही पत्रकार आहोत आम्ही बैठक कव्हर करायला चाललो आहोत असं सांगितलं. मात्र आमच्या गाड्या बाजूला घ्यायला लावल्या त्यानंतर तुम्ही पत्रकार असो वा कोणीही असो तुमच्या गाड्या सोडणार नाही. इथं यायचं नाही असं सांगितलं. त्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला. त्यानंतर आमच्यावर हल्ला करण्यात आला. दगडाने किरण ताजणे यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिथं असलेल्या मुलांनी अजून काही मुलं जमा केली. त्यानंतर सर्व पत्रकारांना मारहाण करण्यात आली.
या हल्ल्यानंतर नाशिकमधील नेते छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांनी गंभीर जखमी झालेल्या पत्रकारांची विचारपूस केली. याबाबत मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी 'पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर पुढं कोणतीही कारवाई होत नाही. पत्रकारांवर हल्ला होऊ नये म्हणून कायदा केला. पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजवाणी करावी.' अशी मागणी केली.
त्याचबरोबर त्यांनी, कायद्याची अमलबजावणी होत नाही म्हटल्यावर हे गुंड मोकाट झाले आहेत. त्यामुळं पत्रकारांवर हल्ले करण्याचं प्रमाण वाढलं आहे. असं देखील म्हटलं.