नाशिक : पुढारी गौरव 2025 सन्मान सोहळ्यात उपस्थित प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, निवासी संपादक डॉ. राहुल रनाळकर, जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब वाजे यांच्यासह जिल्हाभरातील प्रतिष्ठित मान्यवर पुरस्कारार्थी.  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Pudhari Gaurav-2025 : कर्तृत्ववान, प्रतिभावंतांचा 'पुढारी गौरव'ने सन्मान

शानदार सोहळा : 47 प्रतिष्ठितांच्या कार्यकर्तृत्वाचा यथोचित गौरव

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : तमाम मराठी वाचकांच्या अनेक पिढ्यांशी अखंड जिव्हाळ्याचे नाते जपलेल्या दै. 'पुढारी'ने विविध क्षेत्रांत लौकिक निर्माण केलेल्या मान्यवरांचा सन्मान अत्यंत शानदार सोहळ्यात 'पुढारी गौरव- २०२५' पुरस्काराने करण्यात आला. कर्तृत्ववान, प्रतिभावंत आणि आपल्या क्षेत्राला गौरव प्राप्त करून देणाऱ्या प्रतिष्ठित मान्यवरांचा सन्मान करताना, त्यांच्या कार्याला दिलेला उजाळा हा पुढील वाटचालीसाठी त्यांना हुरूप देणारा अन् इतरांसाठी आदर्श निर्माण करणारा ठरला.

इंदिरानगर येथील हॉटेल सयाजी पॅलेस येथे रंगलेल्या या सोहळ्यास प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची प्रमुख उपस्थिती होती. राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, उद्योग, आरोग्य, कला आदी क्षेत्रांमध्ये लौकिकप्राप्त ४७ मान्यवरांचा 'पुढारी गौरव-२०२५' स्मृतिचिन्ह देऊन हृद्य सन्मान करण्यात आला. देशाच्या शिक्षण धोरणात योगदान देणाऱ्यांपासून ते चालक म्हणून कार्य करत स्वत:च्या करिअरला उत्तुंग भरारी देणाऱ्या जिल्हाभरातील प्रतिष्ठित मान्यवरांचा यात समावेश होता. आपल्या कुटुंबीयांसमवेत पुरस्कार स्वीकारताना, पुरस्कारार्थींच्या चेहऱ्यावरील भाव आपल्या कार्याविषयी समाधान दर्शविणारे होते, तर 'पुढारी'ने पाठीवर दिलेली कौतुकाची थाप जबाबदारी वाढविणारी असल्याच्या भावना पुरस्कारार्थींनी व्यक्त केल्या.

पाहुण्यांचा जीवनप्रवास हुरूप देणारा

'पुढारी गौरव' पुरस्कार सोहळ्यात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आपला प्रवास कथन केला. डॉ. तात्याराव लहाने यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून संघर्षमय जीवन जगत, समाजसेवेचा वसा कसा जपला, याबाबतचा सांगितलेला प्रवास पुररास्कार्थींना हुरूप देणारा ठरला. पुरस्कार म्हणजे पाठीवर दिलेली शाबासकी असली, तरी जबाबदारी वाढवणारा असतो. त्यामुळे 'जोमाने आपल्या क्षेत्रात प्रगतीचे उत्तुंग शिखर गाठा' हा त्यांचा संदेश पुरस्कारार्थींसाठी पुढील वाटचालीसाठी दिशादर्शक ठरला, तर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी, 'पोलिस अधिकारी कसा बनलो' याबाबतचा सांगितलेला प्रवास उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

नाशिक : पुढारी गौरव 2025 सन्मान सोहळ्यात उपस्थित प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, निवासी संपादक डॉ. राहुल रनाळकर, जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब वाजे यांच्यासह जिल्हाभरातील प्रतिष्ठित मान्यवर पुरस्कारार्थी.

तुमच्या क्षेत्रातील तुम्हीच खरे हिरो! - पोलिस आयुक्त संदीप कर्णिक

सिनेमामध्ये हिरोला बघून आपण भारावून जातो. मात्र, खरे हिरो तुम्ही आहात. तुमच्या क्षेत्रातील तुमचे कार्यच तुम्हाला हिरो बनविते. त्यामुळे आपआपल्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करा. तुमच्यामुळेच आपण देश आणि समाज सक्षम होईल, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले.

'पुढारी गौरव-२०२५' या शानदार सोहळ्यात बोलताना पोलिस आयुक्त कर्णिक यांनी, पुरस्कार्थींचे यथोचित अभिनंदन करताना त्यांच्या कार्य, कर्तृत्वाविषयी समाधान व्यक्त केले. प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारा हा प्रत्यक्ष जीवनात नायक असतो. पोलिस खात्यात अधिकाऱ्यांपेक्षा कॉन्स्टेबल हा समाज रक्षणासाठी सज्ज असतो. त्यामुळे तोच खरा 'हिरो' ठरतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांना विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

नाशिक पोलिसिंगमध्ये केलेल्या बदलाविषयी बोलताना ते म्हणाले, 'पोलिस खाते हे लोकाभिमुख व्हावे, यादृष्टीने काही बदल केले आहेत. मागील दहा-पंधरा वर्षात तंत्रज्ञानात झालेला अमुलाग्र बदल लक्षात घेवून, आम्ही तंत्रज्ञानाचाच आधार घेत लोकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यातून बरेच प्रश्न सुटत असून, काही दूर्लक्षितही राहतही असतील. मात्र, लोकांचे प्रश्न ऐकुन घेण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'सीपी व्हाॅट्सॲप नंबर' या प्रयोगाविषयी बोलताना पोलिस आयुक्त कर्णिक म्हणाले, नागरिकांकडून पोलिसांना थेट फिडबॅक मिळत नव्हता. मात्र, 'सीपी व्हॉट्स ॲप नंबर' या प्रयोगामुळे लोक थेट संपर्क साधत आहेत. 'पोलिस पेट्रोलिंग आणि व्हिजिबल पोलिस' यासाठी 'सुरक्षित नाशिक ॲप' हा प्रयोग देखील अत्यंत प्रभावी ठरत आहे. आता एआय आणि जीपीएस हे नवीन तंत्रज्ञान आले आहे. त्यामुळे पोलिस घटनास्थळी पोहोचतात काय? याची माहिती मिळणे शक्य होत आहे. याचा अर्थ मी पोलिसांना त्रास देतो असा होत नाही. मी केवळ कामाबाबत माझ्या सहकाऱ्यांना त्रास देतो. त्यांच्या सुट्ट्या व इतर बाबतीत त्यांची काळजी घेत असल्याचेही पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

अंमली पदार्थ, ड्रग्ज आणि नार्कोटीक्स या नव्या आव्हानाबाबत पोलिस आयुक्त कर्णिक म्हणाले, लोकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. तरुणांना आपण जोपर्यंत सुरक्षित ठेवत नाही, तोपर्यंत हे आव्हान संपणार नाही. यावर रोज काम करण्याची गरज आहे. मागील दोन वर्षात आम्ही अनेक गुन्हे दाखल केले आहेत. 'सीपी व्हॉट्सअॅप नंबर'वर याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही लगेचच कारवाई देखील केल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षित नाशिकसाठी आम्ही प्रत्येक गोष्टींवर काम करीत आहोत. मात्र, अंमली पदार्थ, ड्रग्ज आणि नार्कोटीक्सचा समुळ नाश करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढाई लढण्याची गरज असल्याचेही पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

खासगी नोकरी ते पोलिस आयुक्त पदाचा प्रवास

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर एमबीए मार्केटींग केले. त्यानंतर खासगी नोकरीही केली. मात्र, आई-वडिलांची इच्छा होती की, मी सरकारी सेवेत जावे. त्यानुसार मी सरकारी नोकरी करण्याचे ठरविले. त्यावेळी कोणत्या क्षेत्रात जावे, याबाबत निश्चित ठरविले नव्हते. मात्र, तरुणांना जसे 'पोलिस' या क्षेत्राचे आकर्षण असते, तसेच मलाही होते. वास्तविक, मी पोलिस व्हावे अशी आई-वडिलांची इच्छा नव्हती. मात्र, माझी इच्छा होती. त्यामुळेच सरकारी क्षेत्रात पोलिस झालो. खरं तर मोठ्यांचे ऐकल्यास आयुष्याचे कल्याण होते, तसेच माझ्याबाबत झाले. स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असलेल्या तरुणांनी, जागा किती रिक्त आहेत, याचा विचार न करता ध्येयाने परिक्षेला सामोरे जाण्याची गरज आहे. २४ तासांपैकी आपण ८ तास झोपत असू, तर उर्वरीत तासांचे नियोजन करून अभ्यास करायला हवे. ध्येयाने पछाडल्यास, यश नक्कीच मिळते, असेही पोलिस आयुक्त कर्णिक म्हणाले.

'यांचा' झाला गौरव

१) डॉ. मिलिंद ढोबळे, २) सचिन जोशी ३) सूरजितसिंग मनचंदा, ४) अतुल मते, ५) प्रा. विनोद राठोड, ६) डॉ. पराग पटणी, ७) शिवानी विलास देसले, ८) योगेश मालपाणी, ९) संजय खताळे, १०) संतोष फटांगळे, ११) निवृत्ती इंगोले, १२) डॉ. गोविंद झा, १३) योगेश पाटील, १४) गणेश मोरे, १५) रुचिर पंचाक्षरी, १६) महेंद्र पगारे, १७) डॉ. सुरेश कांबळे, १८) ॲड. दत्तात्रय चव्हाण, १९) प्रमिला मैंद, २०) चंदन घुले, २) डॉ. उमेश मराठे, २२) संतोष भिसे, २३) दीपक बरखे, २४) दिलीप शेळके, २५) बाळकृष्ण शिरसाठ २६) डॉ. प्रकाश पाटील, २७) डॉ. मनीषा खैरनार- बागूल २८) नितीन कांबळे, २९) कल्पेश कांडेकर, ३०) संदीप तांबे, ३१) इंदुमती नागरे, ३२) तानाजी भोर, ३३) दीपक बलकवडे, ३४) ज्ञानेश्वर गायकवाड, ३५) पल्लवी पाटील ३६) बाळासाहेब घडवजे, ३७) रंगनाथ जाधव, ३८) बाळासाहेब गायकवाड, ३९) संदीप वाजे, ४०) सतीश धात्रक, ४१) राकेश थोरात, ४२) संतोष कचरे, ४३) अनिल खोत, ४४) डॉ. विलास सुशीलाबाई-दामोधर चांडोले, ४५) स्नेहल आव्हाड, ४६) एकनाथ पवार, ४७) वैभव कुलकर्णी.

भावनेने भिजला पुरस्कार सोहळा

दृश्य कला क्षेत्रातील आर्ट डिलर आणि इंडीआर्ट रुचिर पंचाक्षरी यांना नाशिक मध्ये मिळालेला पहिला पुरस्कार पाहून त्यांच्या आजारी असूनही सोहळ्यात आर्वजून उपस्थित राहिलेल्या त्यांच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले. ज्या शहरात पुत्राचे कर्तृत्व रुजले फुलले, जिथे आर्ट गॅलरी टाकली तिथेच पहिल्यांदा अग्रगण्य वृत्तपत्र समुह दै. 'पुढारी' कडून मिळालेला पुरस्कार स्वीकारताना या मातेच्या डाेळ्यात मुलांने कर्तृत्वाला मिळवलेला पुरस्कार पाहून आनंदाश्रू तरळलेे. हा पुरस्कार माझ्या सुपत्राच्या कार्याची दखल घेणारा असून कलेलाही दिलेला पुरस्कार आहे, अशा प्रतिक्रिया त्यांनी यावेळी साश्रु नयनांनी व्यक्त केल्या.अशा अनेक पुरस्कार्थींच्या परिवारातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आपल्या प्रियजनांचा गौरव होताना आनंद आणि अभिमान यांचे संमिश्र भाव पाणावलेल्या डोळ्यात दिसले.

अन‌् संवादातून रंगला सोहळा

पुरस्कार्थींनी पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी दै. 'पुढारी' च्या उपक्रमाचे कौतुक केले. त्यामध्ये काही पुरस्कार्थींच्या परिवातील सदस्यांनी कविता सादर करून उपक्रमाचे आणि आपल्या प्रियजनांच्या कार्याचे प्रतिभेतून कौतुक केले. पुरस्कार सोहळ्यानंतर अनेक जणांनी गाैरवचिन्हासह फोटो काढून ते तत्काळ सामाजिक माध्यमात सामाईक केले.

'पुढारी गाैरव' हा केवळ पुरस्कार, गौरव नसून, यापूढे अधिक उत्तम कार्य करण्यासाठी प्रेरणा आणि जबाबदारी देणारा सन्मान आहे.'पुढारी' म्हणजे पुढाकार घेणारे. 'पुढारी' वृत्तपत्राने समाजात पुढाकार घेऊन सकारात्मक बदल घडवणाऱ्या ४७ व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला, याबद्दल संपूर्ण 'पुढारी' परिरावाचे मनःपूर्वक आभार मानतो. पुरस्कारामुळे मनस्वी आनंद झाला आहे.
सचिन जोशी, पुस्कारार्थी (सुप्रसिद्ध शिक्षण अभ्यासक).
दै 'पुढारी'ने विविध क्षेत्रातील हिऱ्यांचा यर्थाथ गाैरव केला. अनेक पुरस्कार मिळाले काही शिक्षण व्यासपीठावरुन मिळाले. मात्र मोठ्या वृत्तपत्र समुहाने माझ्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार हा खूप वेगळा, मोठा आणि प्रतिष्ठेचा आहे. तो स्वीकारताना अत्यानंद झाला. या मानाच्या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल दै. 'पुढारी'चे आभार मानतो.
प्रा. डॉ. मिलींद ढोबळे, पुरस्कारार्थी (अधिष्ठाता, एमआयटी सोफा, पुणे)
दै. पुढारी ने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गाैरव करुन त्यांच्या कामाची दखल घेऊन हुरुप, उत्साह वाढवला. पुुरस्काराचा हा क्षण अविस्मरणीय आहे. यातून कामाची प्रेरणा मिळाली.
सुरजीतसिंग मनचंदा, पुररास्कार्थी (संचालक, एनआयएफ).
एका लहान गावात आंबडेकर चळवळीत काम करणाऱ्या, जनेतेचे प्रश्न संघर्ष करुन सोडवणाऱ्या भीमसैनिकाची दखल दै.'पुढारी' घेऊन पुरस्कृत केले. त्याबद्दल पुढारी परिवराचे आभार मानतो. पुरस्काराने नवी उर्जा मिळाली असून आता जबाबदारी वाढली आहे.
महेंद्र पगारे, पुरस्कारार्थी
येवल्या सारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा करत आहे. ज्यांना लहानपणापासून पाहत आलोय ज्यांचा आदर्श माझ्या डाेळ्यांसमोर आदर्श आहे. त्या पद्श्रमी डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पुरस्कार आहे. डॉ लहाने सर आणि 'पुढारी' समुहाचा पुरस्काराच आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे.
डॉ. सुरेश कांबळे, पुरस्कारार्थी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT