नाशिक : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मीक कराडला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटातर्फे मायको सर्कल येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. कराडच्या प्रतिकृतीला फासावर लटकावत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. औरंगजेबवर स्तुतिसुमने उधळणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या प्रतिमेलाही जोडे मारत निषेध नोंदविण्यात आला.
शिवसेना उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे व अनिल ढिकले यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. देशमुख हत्याप्रकरणी 'सीआयडी'ने सोमवारी (दि. 3) आरोपपत्र दाखल केले असून, त्यामधील व्हिडिओ क्लिप आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या माध्यमातून देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
खंडणी आणि दहशत माजवण्यासाठी जर एका सरपंचाची अशी निर्घृण हत्या होत असेल, तर सर्व दोषींना तत्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा विकृत प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त आवश्यक असल्याचे मत बोरस्ते यांनी व्यक्त केले. या गंभीर प्रकरणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे औरंगजेबविषयी स्तुतिसुमने उधळत महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल समाजवादी पार्टीचे आ. आझमी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुदाम डेमसे, श्यामकुमार साबळे, शिवाजी भोर, दिगंबर मोगरे, प्रमोद लासुरे, अमोल सूर्यवंशी, विधानसभाप्रमुख रोशन शिंदे, जीवन दिघोळे, महिला आघाडी ग्रामीण जिल्हाप्रमुख मंगला भास्कर, महानगरप्रमुख अस्मिता देशमाने, मंदाकिनी जाधव, ज्योती फड, सुनीता जाधव, उपमहानगरप्रमुख आनंद फरताळे, उमेश चव्हाण आदी उपस्थित होते.