नाशिक

नाशिकमध्ये भाजपकडून नाना पटोलेंच्या प्रतिमेचे दहन

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शेगाव येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून पाय धुऊन घेतल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा व महिला मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. रविवार कारंजा चौकात पटोलेंच्या प्रतिमेला जोडे मारत प्रतिमेचे दहन करण्यात आले. सदर कृत्यातून काँग्रेसची सरंजामशाही मानसिकता समोर आल्याची टीका यावेळी भाजपकडून करण्यात आली.

पटोले शेगाव दौऱ्यावर असताना एक कार्यकर्ता त्यांचे पाय धुवत असल्याचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. नाशिकमध्ये भाजपने रविवार कारंजा चौकात पटोलेंच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केला. 'सदर कृत्य काँग्रेसची सरंजामशाही मानसिकता देशासमोर आणणारे असून, यामुळे लोकशाहीची प्रतिमा मलिन झाली आहे.' असे मत भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव आणि आमदार सीमा हिरे यांनी यावेळी व्यक्त केले.

महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीला काळिमा फासणारी ही घटना असून, पटोलेंनी सदर घटनेवर माफी मागणेही उचित न समजणे निषेधार्ह आहे.' असे मत युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर शेलार यांनी मांडले. या आंदोलनात छाया देवांग, माधुरी पालवे, सरचिटणीस रोहिणी नायडू, ॲड. श्याम बडोदे, रश्मी हिरे, अनिता भामरे, मंडल अध्यक्ष वसंत उशीर, अविनाश पाटील, रवी पाटील, भाजपा नेते महेश हिरे, सोनाली दगडे, हेमंत शुक्ल, आदी उपस्थित होते.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT