Oil And Pulses Pudhari
नाशिक

Grocery Price Hike | महागाईचा थेट फटका; कडधान्य, खाद्यतेल आणि शेंगदाण्यांच्या दरात मोठी उसळी

Grocery Price Hike | गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय संघर्ष पाहावयास मिळत आहे. त्याच्या झळाही अधिक तीव्र जाणवत असून, बाजारपेठेला मोठा झटका बसत आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सुषमा गवारे

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय संघर्ष पाहावयास मिळत आहे. त्याच्या झळाही अधिक तीव्र जाणवत असून, बाजारपेठेला मोठा झटका बसत आहे. गेल्या आठवड्यात खाद्यतेल आणि सुकामेव्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आता डाळी आणि शेंगदाण्याच्याही दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांसमोर महागाईचे संकट उभे ठाकले आहे.

दैनंदिन स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या कडधान्य व इतर किराणा सामानाच्या दरात गेल्या काही दिवसांत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. तूरडाळ, हरभराडाळ, मसूरडाळ, मूगडाळ व वाटणा यांसारख्या कडधान्याचे दर वाढले आहे.

आधीच खाद्यतेलांनी सुकामेव्याच्या वाढत्या दराने सामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असताना आता डाळी आणि शेंगदाण्याचे दरही उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. यातच भर म्हणजे यंदा अतिवृष्टीमुळे शेंगदाण्यांचे उत्पादन केवळ ४० टक्क्यांवर आले असून ७० रुपये प्रतिकिलोने वाढले आहेत.

बाजारात १२० ते १२५ रुपये किलोप्रमाणे विक्री होणाऱ्या शेंगदाणे आता १८० ते २०० रुपये दराने मिळत आहेत. व्यावसायिकांनाही याचा मोठा फटका बसत आहे. सर्व डाळींचे दरही पाच ते बारा रुपये प्रतिकिलोने महागले आहेत.

जगातील अनेक देशांमधील संघर्ष लवकर निवळण्याची चिन्हे नसल्याने त्याचा दीर्घकालीन परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत असून, येता काही दिवसांत महागाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गत आठवड्यापासून कडधान्य, तेल व शेंगदाण्याची आवक अपेक्षित होत नाही. हवामानातील बदलामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून, वाहतूक खर्च वाढला आहे. परिणामी घाऊक बाजारातील दर वाढले असून, त्याचा थेट परिणाम किरकोळ ग्राहकांवर होत आहे.
- मधुसूदन करपे, व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT