Goa Police President Colour Award 
नाशिक

Goa Police President Colour Award | गोवा पोलिस दलाचा ऐतिहासिक गौरव; प्रेसिडेंटस् कलर सन्मान मिळवणारे 15 वे राज्य!

Goa Police President Colour Award | मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे पोलिस दलाला 'प्रेसिडेंटस् कलर' सन्मान प्रदान सोहळ्यात प्रतिपादन

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा पोलिस दलाला 'प्रेसिडेंटस् कलर'चा सन्मान प्रदान होणारा हा दिवस गोवा राज्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'प्रेसिडेंटस् कलर' प्राप्त करणारे गोवा हे देशातील १५ वे राज्य ठरले आहे. ही केवळ पोलिस दलाचीच नव्हे; तर संपूर्ण गोव्याची मान अभिमानाने उंचावणारी घटना आहे.

आमचे पोलिस दल अत्यंत शिस्तबद्धता, समर्पण आणि 'शौर्य, सुरक्षा आणि सेवा' या ब्रीद वाक्याला जागून कार्य करत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पोलिस दलाला प्रेसिडेंटस् कलर ध्वज सन्मानपूर्वक आणि नेत्रदीपक पोलिस संचलनाने प्रदान केल्यावर मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, या ध्वजाचे हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम व पंजाबी धर्मगुरूंनी मंत्रोच्चारात विधिवत पूजन करून पोलिस दलाला आशीर्वाद दिल्याने पोलिसही भारताची एकता, अखंडता कायम ठेवण्यासाठी काम करतील. राज्य सरकार पोलिस दलाच्या आधुनिकतेवर सातत्याने भर देत असून आधुनिक उपकरणे, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा पुरवण्याचे काम वेगाने सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रपती ध्वज चिन्ह हा पोलिसांचा आणि त्यांच्या परिवाराचा सन्मान आहे. हा सन्मान म्हणजे गोव्यातील जनतेच्या रक्षणासाठीचे पवित्र वचन आहे, सेवेला कटिबद्ध राहणे हा पोलिसांचा धर्म आहे. स्वयंपूर्ण गोवा पोलिसांना सज्ज व सक्षम करण्यासाठी, त्यांच्या कार्याला दिशा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

गृहमंत्रालयाने पोलिसांना वेळोवेळी मनुष्यबळ, पायाभूत सुविधा दिल्या आहेत. गोमंतकीय आणि पर्यटकांना सुरक्षा देण्यासाठी गृहमंत्रालयाने वेगवेगळे उपक्रम सुरू केले आहेत. पोलिसांना अत्याधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त सुविधा पुरविल्या आहेत, असे सांगून राज्यातील सर्व प्रकारचे गुन्हेगारी कमी करणारे आणि सर्वात सुरक्षित असणारे गोवा देशातील पहिले राज्य बनेल, असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

सन्मानाने देशाच्या कपाळावरील बिंदी चमकली

एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याचा उल्लेख भारत देशाच्या कपाळावरील सुंदर बिंदी असा उल्लेख केला होता, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्याला मिळालेल्या या सन्मानामुळे ही बिंदी अभिमानाने चमकत आहे. शहा यांच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज चिन्ह मिळणे ही गोव्यासाठी गौरवाची गोष्ट असून, याची नोंद इतिहासात होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT