नाशिक : मागील काही दिवसांपासून सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून पश्चिम पट्ट्यातील बागायती भागात पावसाचा जोर जास्त आहे. त्यामुळे या भागात पावसामुळे काही ठिकाणी शेतीकामे ठप्प असून काही ठिकाणी शेतीकामांना वेग आला आहे. एकूणच या पावसामुळे 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे.
नाशिकरोड, मखमलाबाद, गंगापूर, दरी-मातोरी, भगूर, इगतपुरी, घोटी, पळसे, येथे बागायती भागासह जिरायती भागातदेखील पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावली. सध्यादेखील पावसाचे वातावरण असून अजूनही काही दिवस हा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. परिणामी पावसामुळे ठिकठिकाणी शेती कामे ठप्प असल्याची स्थिती आहे. पावसाने आणखी जोर धरला तर आणखी काही दिवस शेतीकामांना ब्रेक लागणार आहे.
सध्या मान्सूनपूर्व पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावल्याने सगळीकडे पावसाळी वातावरण झाले आहे. मोठ्या पिकांना याचा फायदा होत असला तरीदेखील छोट्या पिकांना याचा फटका बसत आहे. वाडी-वस्त्यांवरील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून चारा पिके व दूध वाहतूक करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या भागात आलेल्या मेढपाळांना देखील अवकाळी पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे.
गेली काही दिवसांपासून तालुक्यातील वेगवेगळ्या भागात दररोज मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. या पावसामुळे वाडी-वस्त्यांवरील रस्त्यावर चिखल पसरला असून काही ठिकाणच्या खराब रस्त्यावर पाण्याची डबकी साचली आहेत.