Porvorim Flyover Traffic Issue 
नाशिक

Porvorim Flyover Safety | पर्वरी उड्डाणपुलाच्या सुरक्षेसाठी आयआयएम नागपूरची टीम मैदानात; PWD अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी

Porvorim Flyover Safety | आयआयएम नागपूरकडून पाहणी : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
नव्या उड्डाण पुलावरून प्रवेशासोबतच सुरक्षितताही महत्त्वाची आहे. त्यामुळे पर्वरीतील सहा पदरी उड्डाण पुलावर जाण्यासाठी असलेला प्रवेश आणि निर्गमन मार्ग खुले करण्यासाठीचा अभ्यास करण्यासाठी शनिवारी (दि. १९) नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या (IIM) अधिकारी, अभियंत्यांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, अभियंत्यांसोबत पुलाची पाहणी केली.

राष्ट्रीय महामार्ग ६६ वर उभारण्यात आलेले हे उड्डाण पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुले होते. मात्र उद्घाटनानंतर तिसऱ्याच दिवशी झालेल्या अपघातामुळे दुचाकी वाहनांना बंदी केली. त्याबरोबर पुलाच्या दोन्ही बाजूने पर्वरीतून जाण्यासाठीचे मार्ग बंद केले. त्यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. याची दखल घेत स्थानिक आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी तत्काळ बैठक बोलावून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती.

शनिवारी सकाळी आयआयएम नागपूरचे अधिकारी आणि अभियंते यांच्याशी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि अभियंते यांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीनंतर पुलाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी पुलाची सध्या असलेली स्थिती अभ्यासण्याबरोबरच अपघात रोखण्यासाठी काय करता येईल या दृष्टीने पाहणी करण्यात आली. त्यासंबंधीची माहिती एकत्रित करून पुन्हा बैठक घेतली जाणार आहे.

यामध्ये पुलाच्या लेन आहे तशाच ठेवाव्यात की कमी-जास्त कराव्यात, निर्गमन मार्गाचे स्वरूप कसे असावे, येथे सर्कल उभारून वाहतुकीचा वेग नियंत्रित करता येणे शक्य आहे काय, यासारख्या बाबींचा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी मेरशी जंक्शन आणि कदंब बसस्थानक येथील परिसराचाही अभ्यास केला जाणार आहे.

दरम्यान, आयआयएम नागपूर आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते यांच्यामध्ये पुलाच्या उद्घाटनावेळीच सामंजस्य करार झालेला आहे. त्यानुसार आयआयएम राज्यातील रस्ते आणि वाहतुकीचा अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर त्यावर सरकार निर्णय घेत अंमलबजावणी करणार आहे. ज्या पुलावरील समारंभात या दोन्ही अहवालावर सह्या करण्यात आल्यात.

पुढील 48 तासांत महत्त्वपूर्ण निर्णय

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वरीवासियांना उड्डाण पुलावरून जाता यावे, तसेच अटल सेतूवरही प्रवेश करता यावा हे जेवढे महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांची सुरक्षितताही महत्त्वाची आहे.

यासाठी शनिवारी झालेल्या बैठकीनंतर आयआयएम नागपूरच्या अधिकारी आणि अभियंत्यांनी उड्डाण पुलाची पाहणी केली. त्यांनी सुचवलेल्या उपायांबाबत कारवाई करण्याबाबत पुढील ४८ तासांत निर्णय घेऊन योग्य पावले उचलली जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT