जळगाव: रावेर येथील एका हॉस्पिटलने बायोवेस्टसाठी (Bio waste) लागणारे प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ जळगाव या ठिकाणी अर्ज केला होता. तो अर्ज रिजेक्ट करण्यासाठी पंधरा हजार रुपयाची लाच घेताना क्षेत्र अधिकारी (वर्ग-०२, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, जळगाव) यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावेर येथे असलेल्या हॉस्पिटलमध्ये बायोवेस्ट संबंधित प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 16 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ या ठिकाणी अर्ज करण्यात आला होता. सदर अर्जात क्षेत्र अधिकारी राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी यांनी त्रुटी काढल्या. त्यांनतर त्यांनी सदर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, नाशिक कार्यालयात अर्ज करून सदरचे प्रमाणपत्र २८/०८/२०२५ रोजी प्राप्त केले आहे.
परंतु त्यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, जळगाव कार्यालयात केलेला अर्ज काढुन घेण्यासाठी तक्रारदार हे दि. ११ रोजी कार्यालयात गेले होते. त्यावेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, जळगाव कार्यालयातील आलोसे राजेंद्र सुर्यवंशी यांनी अर्ज रिजेक्ट करण्याकरीता १५ हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी 23 रोजी लाप्रवि., जळगाव येथे लेखी तक्रार दिली. त्याप्रमाणे प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता, आलोसे श्री. राजेंद्र सुर्यवंशी यांनी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार लाचेची मागणी करून, मनोज बापु गजरे (खाजगी इसम) यांना देण्यास सांगितले.
बुधवारी (दि. 24) Anti Corruption विभागाने कारवाई केली. दरम्यान आलोसे राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी यांनी तक्रारदार यांना मागणी केल्याप्रमाणे १५ हजार रुपयाची लाच रक्कम मनोज बापु गजरे (खाजगी इसम यांनी स्वीकारली, म्हणुन आलोसे राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी व मनोज बापु गजरे (खाजगी इसम) यांचेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, बाळु मराठे, भुषण पाटील यांनी ही कारवाई यशस्वी केली.