नाशिक : पत्रकार परिषदेत बोलताना सुजात आंबेडकर. शेजारी वंचितचे पदाधिकारी. Pudhari News Network
नाशिक

Politics News Nashik | भाजप सोडून वंचितचे दरवाजे सर्वांसाठी खुले

सुजात आंबेडकर : मित्रपक्षांशीही युतीला नकार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सोडून इतर सर्वांसोबतच वंचित बहुजन आघाडी युती करण्यास तयार आहे. मात्र, स्वाभिमान जपूनच युती किंवा आघाडी केली जाईल, असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले.

येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास आले असता, शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, आगामी निवडणुकांमध्ये वंचितने युती- आघाडीबाबतची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. आम्ही भाजपशी लढा देत असून, तो पुढील काळातही सुरूच राहणार आहे. त्यामुळे भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना सोडून इतर पक्षांबरोबर युती करण्यास आम्ही तयार आहोत. भाजपचे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे मित्र पक्ष आहेत. भविष्यात राष्ट्रवादीचा शरद पवार गट किंवा अन्य एखादा पक्ष महायुतीला जोडला गेला, तर वंचित त्यांच्याशी युती- आघाडीचा विचार करणार नाही. तसेच निवडणुकीत युती- आघाडीचा सर्वस्वी निर्णय हा स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सोडला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही आम्ही युती-आघाडीसाठी दरवाजे खुले ठेवले होते. मात्र, पदाधिकाऱ्यांना तासन‌्तास बसवून ठेवणे, ४८ पैकी एकाच जागेवर चर्चा करणे असे घडत असल्यामुळे आम्ही आमचा स्वाभिमान जपला. त्यामुळे आगामी काळातही युती- आघाडी करताना आमच्यासह कार्यकर्त्यांकडून स्वाभिमान जपला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी महानगरप्रमुख अविनाश शिंदे, प्रदेश पदाधिकारी अरुण जाधव, चेतन गांगुर्डे, महाराष्ट्र सचिव वामन गायकवाड, दिशा पिंकी शेख, दामोदर पगारे, ऊर्मिला गायकवाड आदी उपस्थित होते.

विमान अपघातातील प्रवासी हे व्यवस्थेचे बळी

बस असो वा लोकल अपघात, बंगळुरू येथील स्टेडियममध्ये झालेली चेंगराचेंगरी तसेच अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात या सर्वांमध्ये ज्यांचा बळी गेला आहे, तो व्यवस्थेमुळे गेला आहे. स्थानिक सरकारच्या हलगर्जीपणामुळे लोकांचा बळी जात आहे. प्रत्येक विकासकामांमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याने, अशा प्रकारचे अपघात होत असल्याचा आरोपही सुजात आंबेडकर यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT