नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मंगळवार, बुधवारच्या पावसाने सिंहस्थ रस्ते कामांच्या गुणवत्तेसह महापालिका प्रशासनाच्या कारभाराची पोलखोल केल्यानंतर आता राजकारण चांगलेच तापले आहे. मान्सूनपूर्व कामांचा उडालेला बोजवारा, रस्त्यांची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटींवरून महापालिका प्रशासनाला विरोधकांसह सत्ताधारी घटकांकडूनही लक्ष्य केले जात आहे.
भाजपसह सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना (शिंदे गट) पाठोपाठ विरोधक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटानेही या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेत विशेष महासभा घेण्याची मागणी केली आहे.
शहरातील पूरस्थितीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक भागांत रस्ते जलमय झाले, घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले, वाहतूक विस्कळीत झाली. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दोन्ही शिवसेना गटांनी प्रशासनाला जाब विचारण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष महासभेची मागणी मान्य होते का आणि त्यात प्रशासनाकडून कोणते स्पष्टीकरण दिले जाते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना (शिंदे गट) गटनेते अजय बोरस्ते आणि स्थायी समिती सदस्य राहुल दिवे यांनी महापौरांना निवेदन देत विशेष महासभा घेण्याची मागणी केली आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असतानाही शहराची झालेली अवस्था गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व कामांचे सोशल ऑडिट आणि तांत्रिक ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
सिंहस्थ पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. नव्याने तयार झालेले रस्ते पहिल्याच पावसात खराब झाल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय झाला आहे का, याची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ७ आणि ८ जुलै रोजी झालेल्या नुकसानीबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच बाधित नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे गटनेते केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी महापौरांना निवेदन देत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. पावसामुळे शहरातील ड्रेनेज व्यवस्था कोलमडली असून, अनेक भागांत सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्त्यांवरील खड्डे, पडलेली झाडे आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकची प्रतिमा देश-विदेशात पोहोचणार असताना महापालिकेचा सध्याचा कारभार चिंताजनक असल्याचे उबाठा गटाने म्हटले आहे. शहरातील समस्या सात दिवसांत मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कोट्यवधींच्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत असल्याने प्रशासनावर दबाव वाढला आहे.
महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी सायं. ४ वाजता शिवसेना (उबाठा)चे गटनेते केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आयुक्त कार्यालयात दाखल झाले. मात्र, भेटीची वेळ निश्चित असूनही आयुक्त मनीषा खत्री सुमारे अर्धा तास उशिराने पोहोचल्याने शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
'या प्रशासनाचे करायचे काय... खाली डोकं वरती पाय', 'भाजप मुर्दाबाद, शिवसेना जिंदाबाद' अशा घोषणांनी आयुक्त कार्यालय परिसर दणाणून गेला. आयुक्त बैठकीसाठी आल्यानंतरही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. यावेळी आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांमध्ये काही काळ शाब्दिक खडाजंगी झाली. 'भाषण न करता ठोस कृती करा, मोदींसारखे भाषण देऊ नका,' असा सवालही पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना केला. बैठक संपल्यानंतरही शिवसैनिकांनी घोषणाबाजी करतच कार्यालयातून बाहेर पडत प्रशासनाविरोधातील आपला निषेध कायम ठेवला.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेनेच्या भूमिकेला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सीमा ठाकरे आणि स्थायी समितीच्या सदस्यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीस जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर चौकशी व कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सत्ताधारी घटकांपासून ते विरोधी पक्षांपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी विकासकामांवर खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. 'कोट्यवधीचा निधी नेमका गेला कुठे?' हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला असून, विशेष महासभा बोलावली जाते का आणि प्रशासन त्यात कोणते स्पष्टीकरण देते, याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे.