Malegaon Chemical Seizure 
नाशिक

Malegaon Chemical Seizure | मालेगावात पहाटे पोलिसांची मोठी कारवाई! खान डाइंग कारखान्यातून 60 किलो रसायने जप्त

Malegaon Chemical Seizure | मालेगावच्या इस्लामुपुऱ्यात धाड! 41 किलो अमोनियम नायट्रेट अन् 19 किलो कॉस्टिक सोडा जप्त.

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरातील इस्लामुपुरा भागातील सुन्नी खानका - ए - बरकतिया मशिदीसमोरील खान डाइंग कारखान्यात पोलिसांनी गुरुवारी (दि. १३) पहाटे तपासणी करून ४१ किलो अमोनियम नायट्रेट व १९ किलो कॉस्टिक सोडा असा एकूण ६० किलो रासायनिक साठा जप्त केला. जप्त केलेला साठा तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.

इस्लामुपुरा परिसरातील कारखान्याबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. स्वामी यांना याबाबत माहिती दिली.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर गुन्हे शाखेचे पथक आणि मालेगाव शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे परिसरात तपासणी केली. पोलिसांनी सुन्नी खानका - ए - बरकतिया मशिदीची तसेच परिसरातील चार ते पाच घरांची तपासणी केली. मशिदीसमोरील खान डाइंग कारखान्यातही पोलिस व फॉरेन्सिक पथकाने तपासणी केली.

या वेळी अमोनियम नायट्रेट व कॉस्टिक सोड्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे. शहरातील साबणनिर्मिती तसेच यंत्रमाग कापड रंगविण्याच्या कारखान्यांमध्ये कापडाचा रंग पक्का करण्यासाठी या रसायनांचा वापर केला जात असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

मात्र, जप्त केलेल्या साठ्याचा नेमका वापर व स्वरूप प्रयोगशाळेच्या तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. तपासणीदरम्यान मशिदीत पोलिसांना कोणताही आक्षेपार्ह साठा अथवा वस्तू आढळली नाही. पोलिसांना तपासणीसाठी नागरिकांनीही सहकार्य केले. या कारवाईत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.

आमदारांचे आवाहन

आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक सिद्धार्थ बारवाला यांची भेट घेऊन रात्री झालेल्या तपासणीची माहिती जाणून घेतली. तसेच शहरातील सर्व मशिदींच्या ट्रस्टना रात्रीच्या वेळी मशिदींना कुलूप लावण्याच्या सूचना करण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT