पोलिस भरतीची ७ जुलैला 'लेखी' परीक्षा होणार आहे.  File Photo
नाशिक

Police Recruitment |पोलिस भरतीची ७ जुलैला 'लेखी'

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्यभरात सुरु असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी सुरु आहे. काही घटकांमध्ये मैदानी चाचणी प्रक्रिया पुर्ण झाली आहे तर काही ठिकाणी अद्याप सुरु आहे. त्यानुसार नाशिक ग्रामीणची चाचणी पूर्ण झाली असून शहराची मैदानी चाचणी येत्या दोन दिवसांत पुर्ण होणार आहे. मैदानी चाचणीनंतर राज्यात ७ जुलैला पाेलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा प्रस्तावित आहे. तर चालक पदासाठी १४ जुलैला परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे भरती झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलिसांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तात नेमण्याचेही नियोजन पोलिस दलाकडून होत आहे.

  • सध्या पोलिस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी सुरु आहे.

  • काही ठिकाणी ही चाचणी पूर्ण झाली आहे.

  • ७ जुलैला पाेलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा प्रस्तावित आहे.

नाशिक शहर, ग्रामीणची काय आहे स्थिती?

नाशिक शहर पोलिस दलात ११८ जागांसाठी पाच हजार ५९० पुरुष, दोन हजार १२५ महिला व दोन तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यानुसार १९ जूनपासून हिरावाडी येथील मीनाताई ठाकरे स्टेडिअमवर मैदानी चाचणी सुरू आहे. तर नाशिक ग्रामीणमधील ३२ रिक्त जागांसाठी मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. शहर पोलिसांची मैदानी चाचणी २९ जून पर्यंत सुरु राहणार आहे. शहरात सात उमेदवारांनी गुणांबाबत हरकत घेतली होती. त्यानुसार पोलिस प्रशासनाने त्यांच्या हरकतींवर कार्यवाही करीत सुधारित गुणवत्ता यादी जाहीर केली. राज्यातील मैदानी चाचणींचा निकाल जुनच्या महिना अखेरीस किंवा १ जुलैपर्यंत लागण्याची शक्यता आहे. पावसामुळे ज्या ठिकाणची भरती तात्पुरती स्थगित झाली, त्या ठिकाणी पुढील तारखा देत मैदानी चाचणी होत आहे. दरम्यान, सध्या बऱ्याच जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतल्याने मैदानी चाचणी पूर्ण करण्यावर यंत्रणेचा भर आहे. त्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी ७ जुलै रोजी राज्यात एकाचवेळी लेखी परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर चालक पदासाठी १४ जुलैला लेखी परिक्षा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणेने पुर्वतयारी सुरु केली आहे.

निवडणूक बंदोबस्ताचा मिळणार अनुभव

जुलै महिन्यात लेखी परिक्षा झाल्यानंतर त्याच महिन्यात अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर भरती झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी निवडले जाईल. त्यानंतर त्यांचे प्रशिक्षण सुरु असतानाच ॉक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान, विधानसभा निवडणूकीचा माहोल राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमारे दीड महिन्यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर या प्रशिक्षणार्थी पोलिसांची निवड आगामी विधानसभा निवडणुकीत बंदोबस्तासह गस्तीसाठी हाेण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांचे नियोजन सुरु आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT