नाशिक

Police Bharti 2024 News | जिल्ह्यात १५० पोलिस शिपाई पदांची भरती

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र पोलिस दलातील हजारो पदांच्या भरती प्रक्रियेस आजपासून (दि.५) सुरू होत आहे. त्यानुसार नाशिक शहर व ग्रामीण पोलिस दलातील रिक्त जागांचाही समावेश आहे. त्याअंतर्गत शहर व ग्रामीण पोलिस दलात एकूण दीडशे पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी मंगळवारपासून (दि.५) अर्ज नोंदणी सुरू होत असून उमेदवारांना एकच अर्ज नोंदणीची अट लागू करण्यात आली आहे.

गतवर्षी नाशिक ग्रामीणमध्ये दीडशे जागांवर पदभरती घेण्यात आली होती. तर सहा वर्षानंतर नाशिक शहरात अंमलदारांची भरती होत आहे. शहर पोलिस आयुक्तालयात ११८ पदांवरील भरती प्रक्रियेसंदर्भात आयुक्त संदीप कर्णिक यांनी अधिसूचना जाहीर केली आहे. तर ग्रामीण पोलिस दलातील ३२ जागांकरीता अधीक्षक विक्रम देशमाने यांनी अधिसूचना जाहीर केली आहे. दोन्ही पोलिस दलातील भरती प्रक्रियेसंदर्भातील कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे 'खाकी'चे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. नाशिक शहरात बऱ्याच वर्षांनी भरती प्रक्रिया होत असल्याने उमेदवारांनी तयारीवर भर दिला आहे. अर्ज नोंदणीनंतर पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादीनुसार लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर प्रवर्गनिहाय अंतिम निवड यादी जाहीर होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. उमेदवारांना काही अडचण आल्यास त्यांनी नाशिक शहरच्या ०२५३-२३०५२३३ किंवा २३०५२३४ या क्रमांकावर आणि नाशिक ग्रामीणच्या ०२५३-२३०९७०० किंवा २२००४५० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्रवर्गनिहाय शहर पोलिस दलातील जागा (कंसात ग्रामीण पोलिस)
प्रवर्ग – पदे
खुला – ५० (०६)
इडब्ल्यूएस – २० (०३)
एसईबीसी – १२ (०३)
ओबीसी – ०२ (०५)
विशेष मागास – ०४ (०१)
अनुसूचित जमाती – २३ (०७)
अनुसूचित जाती – १९ (०३)
भटक्या जमाती ड – ०० (०१)
भटक्या जमाती क – ०० (०१)
भटक्या जमाती ब – ०० (०१)
विमुक्त जमाती अ – ०० (०१)
एकूण – ११८ (३२)

अशी होणार भरती प्रक्रिया
उमेदवारांना ५ ते ३० मार्च पर्यंत ऑनलाइन पद्धतीने policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावरून अर्ज नोंदणी करता येणार आहे. उमेदवारांना एका वेळी एकच अर्ज भरता येणार आहे. कारण सर्व घटकांमध्ये एकाच दिवशी लेखी परिक्षा होणार आहे. शारीरिक व लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी जाहिर होईल. तसेच कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी जाहिर होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT