Sinhasth Kumbh Mela 
नाशिक

Sinhasth Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अभेद्य सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाकडून उच्चस्तरीय विचारमंथन व नियोजनाला वेग

Sinhasth Kumbh Mela | महानसंचालक सदानंद दाते यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहण सोहळा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आता आगामी पर्वांच्या नियोजनासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. ध्वजारोहणात आलेले अनुभव, बंदोबस्तातील त्रुटी, भाविकांची गर्दी, चेंगराचेंगरी रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, वाहतूक व्यवस्थापन आणि व्हीआयपी सुरक्षेच्या अनुषंगाने नियोजन कसे असावे, यावर बुधवारी (दि. ४) व्यापक विचारमंथन झाले.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या पुढाकारातून रावसाहेब थोरात सभागृहामध्ये वरिष्ठ पोलिस अधिकारी, शासकीय अधिकारी, मीडिया प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर आले. सिंहस्थात सर्वांनी समन्वय राखून काम करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

पोलिस महानसंचालक सदानंद दाते यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहण बंदोबस्त अनुभवाचा आढावा घेण्यात आला. चेंगराचेंगरी आणि गर्दी व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजनांवर मार्गदर्शन झाले.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त चंद्रकांत गवली, मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी विविध बाबी स्पष्ट केल्या. सकाळी बंदोबस्त आराखड्याबाबत स्वतंत्र सत्र झाले. त्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बंदोबस्ताबाबत भाविकांची सुरक्षितता, गर्दीचे वर्गीकरण, संवेदनशील परिसर सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा यंत्रणांत समन्वयावर भर देण्यात आला.

सध्याची सुरक्षा आव्हाने आणि बंदोबस्तातील त्रुटी, उपाययोजना, धार्मिक कार्यक्रम, आंदोलने, नागरिकांशी संवाद तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधता योग्य वर्तनाबाबत मार्गदर्शन झाले.
दुपारी शासकीय विभागांतील समन्वयाबाबत चर्चा झाली. त्यात मनपाचे शहर अभियंता संजय अग्रवाल, बांधकामाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, अपर जिल्हाधिकारी हेमांगी राठोड, उपविभागीय अधिकारी मीनाक्षी राठोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, तहसीलदार पंकज पवार यांनी सहभाग घेतला.

दुपारी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया प्रतिनिधींसमवेत स्वतंत्र पॅनल चर्चा झाली. सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत अचूक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे, अफवांना आळा घालणे, वाहतूक बदल, गर्दीची स्थिती, सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन सूचनांचा प्रसार याबाबत चर्चा झाली.

यावेळी दैनिक 'पुढारी'चे निवासी संपादक डॉ. राहुल स्नाळकर, पत्रकार शैलेंद्र तनपुरे, अभय सुपेकर, योगेश खरे, हेमंत भोसले, किरण ताजेणे, चंदन पूजाधिकारी, मुकुंद कुलकर्णी, भूषण महाले, नीलेश अमृतकर, लक्ष्मण घाटोळ, प्रांजल कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.

सिंहस्थ आयोजन करणाऱ्या बाबींचा प्राधान्याने समावेश करावा, याबाबत पत्रकारांनी मत मांडले. सायंकाळच्या सत्रात महासंचालक सदानंद दाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पोलिसांची तयारी, बंदोबस्तातील शिस्त, गुप्तवार्ता संकलन, संभाव्य धोके, सुरक्षा यंत्रणांची सतर्कतेचे महत्त्व अधोरेखित केले. एसपीजी अधिकारी सुब्कांत शर्मा यांनी व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेविषयी मार्गदर्शन केले. सहायक पोलिस आयुक्त अदिता शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

सुरक्षेबाबत धडे

सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये देश - विदेशातून लाखो भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दाखल होणार आहेत. त्यामुळे गर्दी नियंत्रण, चेंगराचेंगरी, आपत्कालीन प्रतिसाद, वाहतूक नियोजन, सुरक्षा यंत्रणातील समन्वय, व्हीआयपी सुरक्षा या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. ध्वजारोहणाच्या अनुभवातून मिळालेले धडे पर्वांच्या नियोजनात समाविष्ट करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT