PNG LPPG gas  
नाशिक

पीएनजी बंद होईना अन् सिलिंडरही मिळेना!

घर बदलणाऱ्या ग्राहकांची कोंडी; एमएनजीएलच्या कारभाराबाबत संताप

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : घर विकले किंवा स्थलांतर झाले, त्यामुळे पीएनजी कनेक्शन बंद करण्याची विनंती करूनही एमएनजीएलकडून जोडणी खंडित होत नसल्याने नाशिकमधील ग्राहकांची कोंडी झाली आहे. एकीकडे पीएनजी कनेक्शन बंद होत नसल्यामुळे जुन्या ग्राहकांच्या नावावर बिल वाढत आहे, तर दुसरीकडे कनेक्शन बंद करण्याच्या प्रक्रियेत असल्याने घरगुती गॅस सिलिंडरची जोडणीही मिळत नसल्यामुळे घर बदलणाऱ्या ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, एमएनजीएलच्या ग्राहकसेवेबाबत ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

शहरात पाइपलाइनद्वारे घरगुती गॅसपुरवठ्याचा विस्तार होत असून, सुमारे ३६ हजारांहून अधिक ग्राहक पीएनजीचा वापर करीत आहेत. मात्र, घर विकल्यानंतर किंवा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यानंतर पीएनजी कनेक्शन बंद करण्याची वेळ आली की, ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर येत आहे. ग्राहकांनी संबंधित यंत्रणेकडे प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन पद्धतीने कनेक्शन बंद करण्याची विनंती केली तरीही प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे कनेक्शन सुरूच राहते.

परिणामी, प्रत्यक्ष गॅसचा वापर नसतानाही ग्राहकाच्या नावावर बिल आकारले जात आहे. त्याचप्रमाणे घर बदलणाऱ्या ग्राहकांसमोरील सर्वात मोठी अडचण म्हणजे पीएनजी कनेक्शन बंद होण्यास विलंब होत असताना नवीन ठिकाणी एलपीजी सिलिंडरची जोडणी घेण्याच्या प्रक्रियेत अडचणीत येत असल्याचे एका ग्राहकाने सांगितले. त्याचप्रमाणे नवीन घरात तातडीने स्वयंपाकासाठी गॅसची आवश्यकता असते. मात्र, जुन्या घरातील पीएनजी कनेक्शन कंपनीच्या नोंदीत सुरू असल्यामुळे ग्राहकांना नवीन ठिकाणी गॅस कनेक्शन मिळविताना अडचणी येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

'स्थलांतरित कुटुंबांसाठी ग्राहकसेवा द्यावी'

स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांसाठी ही समस्या विशेषतः त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे विद्यमान ग्राहकांसमवेत पाइप गॅस नको असलेल्या ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रभावी ग्राहकसेवा यंत्रणा उभारावी, कनेक्शन बंद करण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी आणि घर बदलणाऱ्या ग्राहकांना पीएनजी तसेच एलपीजीच्या संक्रमण काळात अनावश्यक त्रास होणार नाही, यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT