नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले असून, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांची शुक्रवारी (दि. ८) धुळे व नाशिकमध्ये सभा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीचे बडे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या नाशिकमधील सभेची तयारी पूर्ण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये महायुतीने १४ उमेदवार दिले आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा करण्यासाठी थेट पंतप्रधान मोदी नाशकात येत आहेत. धुळे येथील सभा सकाळच्या सत्रात आटोपल्यानंतर दुपारी १२ वाजता पंचवटीतील तपोवनातील मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ओझर येथे वायुसेनेच्या विशेष विमानाने मोदींचे आगमन होईल. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने धुळ्यातील सभास्थळाकडे रवाना होतील. धुळ्यातील सभा आटोपल्यानंतर मोदींचे हेलिकॉप्टर नाशिकला छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नीलगिरी बागेतील हेलिपॅड येथे उतरेल. तेथून मोटारीने ते तपोवनातील सभास्थळाकडे येतील. या सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे, अमर साबळे, मंत्री गिरीश महाजन आदींसह जिल्ह्यातील महायुतीचे सर्व १४ उमेदवार व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. तब्बल एक लाखाहून अधिक लोक या सभेला उपस्थित राहतील, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. मंत्री महाजन यांनी गुरुवारी नाशिकमध्ये येत सभेच्या तयारीचा आढावा घेतला. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सभेची तयारी पूर्ण झाल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी यांनी दिली.