Organ Donation Pudhari
नाशिक

Organ Donation Day Special | 'मृत्यूनंतरही जिवंत राहायचे असेल, तर अवयवदानाचा संकल्प करा'

Organ Donation Day Special | अवयवदानाबाबतचे अंधश्रद्धा अन् गैरसमज दूर करा; डॉ. सुधीर भामरे यांचे आवाहन.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अवयवदान म्हणजे केवळ मृत्यूनंतर आपल्या शरीरातील अवयवदान करण्याची वैद्यकीय प्रक्रिया नाही, तर आपल्या जाण्यानंतरही दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचा मानवतेचा सर्वोच्च संकल्प आहे. आपण जगाचा निरोप घेतल्यानंतरही आपल्या अवयवांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचू शकते, एखाद्या कुटुंबाचा आधार परत मिळू शकतो. एखाद्याच्या डोळ्यांत पुन्हा प्रकाश येऊ शकतो. म्हणूनच अवयवदानाला 'महादान' म्हटले जाते.

अवयवदानाची प्रतिज्ञा करणे निश्चितच महत्त्वाचे आहे. मात्र, त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपल्या कुटुंबीयांना आपल्या इच्छेबद्दल स्पष्टपणे सांगणे. कारण मेंदूमृत झाल्यानंतर अवयवदानासाठी अंतिम संमती कुटुंबीयांकडून घेतली जाते. त्यामुळे आपण अवयवदानाची इच्छा व्यक्त केली आहे, याची माहिती आपल्या जवळच्या व्यक्तींना असणे अत्यंत आवश्यक आहे. आजच आपल्या कुटुंबासोबत अवयवदानाबद्दल चर्चा करा. आपल्या मुलांना, नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला या विषयाची माहिती द्या.

गैरसमज दूर करण्याची गरज

अवयवदानाबाबत समाजात आजही अनेक गैरसमज आहेत. मेंदूमृत म्हणजे मृत्यू नाही, अवयवदान केल्याने शरीराची विटंबना होते, धार्मिक अडचणी निर्माण होतात किंवा अवयवदानाची प्रक्रिया क्लिष्ट असते, अशा अनेक चुकीच्या कल्पना समाजात आढळतात. प्रत्यक्षात अवयवदानाची प्रक्रिया वैद्यकीय, कायदेशीर आणि अत्यंत संवेदनशील पद्धतीने पार पाडली जाते. या विषयाकडे भावनिकतेसोबतच वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. एका कुटुंबाने अवयवदानाचा निर्णय घेतल्याने अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आनंद परत येऊ शकतो. त्यामुळे अवयवदानाबाबत योग्य माहिती समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

...तरी आपण 'आपले' राहू शकतो

आपण या जगातून जाताना धन, संपत्ती, पद, प्रतिष्ठा किंवा भौतिक वस्तू सोबत घेऊन जाऊ शकत नाही. मात्र, आपल्या शरीरातील अवयव एखाद्याच्या नव्या आयुष्याचे कारण बनू शकतात. एखाद्या वडिलांना त्यांच्या मुलांकडे परत आणू शकतात. एखाद्या आईला तिच्या कुटुंबासोबत पुन्हा हसत जगण्याची संधी देऊ शकतात. एखाद्या तरुणाला पुन्हा शिक्षण, नोकरी आणि स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद देऊ शकतात.

काहींच्या आयुष्यात वर्षानुवर्षे प्रतीक्षा असते. एखाद्या रुग्णासाठी योग्य अवयव मिळणे म्हणजे केवळ उपचार नव्हे, तर जगण्याची नवी संधी असते. त्या प्रतीक्षेला पूर्णविराम देण्याची ताकद अवयवदानाच्या एका निर्णयात असते. नेत्रदानातून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश येऊ शकतो. हृदय, यकृत, मूत्रपिंड यांसारख्या अवयवांच्या प्रत्यारोपणातून गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णाला नवजीवन मिळू शकते. आपले अस्तित्व कोणाच्या तरी श्वासात, कोणाच्या तरी स्वप्नात आणि कोणाच्या तरी आनंदात जिवंत राहू शकते.

अवयवदान दिनानिमित्त संकल्प करू या

"माझ्या मृत्यूनंतर माझे अवयव कोणाच्या तरी नव्या आयुष्याचे कारण बनावेत. कारण अवयवदान म्हणजे मृत्यूचा शेवट नाही. तो अनेक नव्या आयुष्यांचा आरंभ आहे. आपल्या जाण्याने जर एखाद्या कुटुंबाला त्यांचा आधार परत मिळत असेल, एखाद्या आई-वडिलांना त्यांचे मूल परत मिळत असेल, एखाद्या तरुणाला त्याची स्वप्ने पुन्हा जगता येत असतील किंवा एखाद्या अंध व्यक्तीला प्रकाश दिसत असेल, तर त्यापेक्षा मोठे दान दुसरे कोणते?"

एक संवाद, एक संकल्प

अवयवदानाची चळवळ केवळ रुग्णालये, डॉक्टर किंवा सामाजिक संस्थांपुरती मर्यादित राहता कामा नये. ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे. कुटुंबातील जेवणाच्या टेबलावर, मित्रांच्या चर्चेत, शाळा-महाविद्यालयांत आणि सामाजिक उपक्रमांत अवयवदानाचा विषय मोकळेपणाने चर्चिला गेला पाहिजे. आज आपण कुटुंबीयांना आपली इच्छा सांगितली, तर उद्या कठीणप्रसंगी त्यांना निर्णय घेणे सोपे होईल. प्रतिज्ञेसोबतच कुटुंबीयांशी संवाद हा अवयवदानाची चळवळीतील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT