सप्तश्रृंगगड : चैत्रोत्सवानिमित्त गडावर उसळेल्या गर्दीमुळे निर्माण झालेली चेंगराचेंगरीसदृश स्थिती.  (छाया : रघुवीर जोशी)
नाशिक

नियोजन काेलमडले ; सप्तश्रृंगगडावर अलोट गर्दीने चेंगराचेंगरीसदृश स्थिती

Nashik Saptashrungi chaitrotsav : वेळीच परिस्थिती आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

सप्तशृंगगड (नाशिक): साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंगगडावर सुरू असलेल्या चैत्रोत्सवात गुरुवारी (दि.10) लाखो भाविकांनी हजेरी लावली. शुक्रवारी (दि.11) रात्रीपासून सुरू झालेला गर्दीचा ओघ दुसऱ्या दिवशी दिवसभर सुरूच राहिल्याने दर्शनबारी थेट धर्मादाय दवाखान्यापर्यंत आली होती. विशेष म्हणजे प्रतीक्षागृहात अचानक वाढलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, वेळीच परिस्थिती आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

सप्तश्रृंगगडावर रामनवमीपासून देवीच्या चैत्रोत्सवाला प्रारंभ झाला असून, राज्यभरातून भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. गुरुवारी गडावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. शुक्रवारी रात्रीपासूनच भाविकांचा ओघ वाढला होता. हजारो भाविक मुक्कामी आले होते. त्यातच गर्दीचा ओघ सुरूच राहिल्याने पहाटेपासून दर्शनबारीत रांगा लागल्या होत्या. त्यातच दुपारच्या सुमारास गर्दी वाढतच गेल्याने भाविकांच्या रांगा थेट गावातील धर्मादाय दवाखान्यापर्यंत पोहोचल्या होत्या. प्रशासन व पोलिसांकडून बैठकीत करण्यात आलेल्या नियोजनानुसार पोलिस बंदोबस्त कुठेही दिसत नव्हता. मंदिर प्रशासनावरही मोठा ताण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. पायरी ते पाटील चौक व निवृत्ती चौक ते धर्मार्थ दवाखान्यापर्यंत बॅरिकेडसच्या सहाय्याने बाऱ्या लावण्यात आल्या होत्या. त्यातच प्रतीक्षा हॉलजवळ गर्दी वाढली होती. या ठिकाणी एकही पोलिस कर्मचारी नसल्याने आणि गर्दी वाढल्याने गोंधळ निर्माण झाला होता. काही ठिकाणी जुने बॅरिकेडस लावल्याने ते तुटून गेले होते. त्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध, महिलांचे प्रचंड हाल झाले. यामुळे भाविकांत तीव्र नाराजी दिसून आली.

चेंगराचेंगरीमुळे हान मुले, वयोवृद्ध, महिलांचे प्रचंड हाल झाले. यामुळे भाविकांत तीव्र नाराजी दिसून आली.
सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवानिमित्त दुपारी भगवतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील व गावातील प्रथम बारीवरील दोरी काहीकाळ निसटल्याने भाविकांची गर्दी विस्कळीत झाली होती. मात्र, सोशल मीडियावर काही चुकीच्या रिल्स व्हायरल झाल्याने भाविकांमध्ये संभ्रम झाला होता. कुठेही चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती नव्हती.
आकनुरी नरेश, सहायक जिल्हाधिकारी, नाशिक

दोन वर्षांपूर्वी सप्तमीच्या दिवशी अशाच प्रकारची गर्दी गडावर उसळली होती. त्यानंतर चैत्र व नवरात्रोत्सव यात्रेचे सूक्ष्म नियोजन केले जात होते. मात्र, यंदा पुन्हा नियोजन कोलमडल्याने चेंगराचेगरींची स्थिती निर्माण झाली होती. यात्रा नियोजन आढावा बैठकीत पोलिस प्रशासनाने २५० पोलिस कर्चमारी नियुक्ती करणार असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात तसे दिसून आले नाही.

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंगगडावर चैत्रोत्सव सुरु आहे.
चैत्रोत्सवासंदर्भात सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या व्हिडिओ व चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती झाल्याबाबत दिली जाणारी माहिती पूर्णपणे चुकीची आहे. भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. विश्वस्त संस्था व ग्रामपंचायत भाविकांच्या सेवेसाठी तत्पर आहे.
ॲड. ललित निकम, विश्वस्त, श्री सप्तशृंगदेवी ट्रस्ट, नाशिक
गडावर पदयात्रेकरूंची मोठी गर्दी होती. गर्दी नियंत्रणासाठी प्राथमिक स्तरावर लावलेल्या दोऱ्या निसटल्याने काही काळ बॅरिकेडस लावताना गोंधळ झाला. मात्र, चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती नव्हती. याबाबत पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
सुदर्शन दहातोंडे, मुख्य व्यवस्थापक, श्री सप्तशृंगदेवी ट्रस्ट, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT