नाशिक : भाद्रपद कृष्ण पक्ष किंवा महालय अर्थात पितृपंधरवड्यास गुरुवारपासून (दि. १८) प्रारंभ झाला. या पंधरवड्यात पुर्वजांचे स्मरण केले जाते. रामकुंड परिसरात पहिल्या श्राद्ध तिथीला भाविकांनी श्राद्ध कर्मासाठी गर्दी केली होती.
१८ प्रतिपदा श्राद्ध
१९ द्वितीया श्राद्ध
२० तृतीया श्राद्ध
२१ चतुर्थी/भरणी श्राद्ध
२२ पंचमी, षष्ठी श्राद्ध
२३ सप्तमी श्राद्ध
२४ अष्टमी श्राद्ध
२५ अविधवा नवमी श्राद्ध
२६ दशमी श्राद्ध
२७ एकादशी श्राद्ध
२९ द्वादशी श्राद्ध
३० त्रयोदशी श्राद्ध
०१ चतुर्दशी श्राद्ध
०२ सर्वपित्री आमवस्या
पौर्णिमा महालय २१, २४, २९, ०
सामान्यत: अनंत चतुदर्शीनंतर पुढच्या दिवसापासून पितृपक्षाला प्रारंभ होतो. पण, यंंदा मंगळवारी (दि. १७) महालयास प्रारंभ झाला. मात्र, या दिवशी पौर्णिमा असल्याने बुधवारपासून पहिली श्राद्ध तिथी लागू झाली आहे. धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षात पितरं हे पृथ्वीवर वास करत असतात. त्यामुळे या कालावधीत तृप्त किंवा अतृप्त अशा सर्व पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदानाचे विशेष असे महत्व आहे. पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यात पितृपक्षास प्रारंभ होतो. त्याचा कालावधी १६ दिवसांचा असतो. या काळात पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो. तसेच व्यक्ती पितृदोषापासून मुक्त होऊन घरात सुख-समृद्धी नांदते, अशी धारणा आहे.
पितृपक्षात दक्षिण वाहिनी गोदावरीच्या तिरावर तर्पण, श्राद्ध व पिंडदानाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे पुढचे पंधरा दिवस देश-विदेशातून भाविक आपल्या पुर्वजांच्या स्मरणार्थ धार्मिक विधी करण्यासाठी नाशिकमध्ये दाखल होतील. यावेळी आपल्या पुर्वजांच्या तिथीनुसार श्राद्धकर्म, तर्पण व पिंडदान केले जाईल.
यंदा २ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण आहे. ते रात्री होणार असून ते भारतात दिसणार नाही. परिणामी ग्रहणाचा सुतक काळ मानला जाणार नाही. त्यामुळे भाविक २ तारखेला श्राद्धविधी करू शकतील, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, पितृपक्ष वाईट नाही. या कालावधीत शुभकार्ये तसेच खरेदी करू नये, हा निव्वळ गैरसमज आहे, असे जाणकरांकडून सांगण्यात आले.
पितृपक्षात नाशिकप्रमाणे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथेही तर्पण व श्राद्धविधीला अधिक महत्व आहे. याच कालावधीत नारायण नागबली, कालसर्प व अन्य शांती केल्यास त्याचे फल अधिक चांगले लाभते, असे म्हटले जाते. त्यामुळे पुढील पंधरा दिवस त्र्यंबकेश्वर येथे भाविकांचा राबता राहणार आहे.