येवला : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हातात आधुनिक तंत्रज्ञानाची साथ, डोळ्यांत गुणवत्तेचे स्वप्न आणि शिकण्यात आनंदाची जोड मिळाली की, शाळेचा कसा कायापालट होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळखुटे ३ रे. या शाळेची यशस्वी यशोगाथा संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
गुणवत्ता, सुंदरता, स्वच्छता, उपक्रमशीलता आणि सामाजिक सहभाग या 'पंचसूत्री'चा प्रभावी वापर करत या शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तालुक्यातील पहिली लोकसहभागातून साकारलेली 'इंटरअॅक्टिव्ह शाळा' ते थेट सुपरनिपुण शाळा, असा या शाळेचा प्रवास प्रेरणदायी आहे.
आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसहभागाचा अनोखा संगम साधत शाळेत इंटरअॅक्टिव्ह बोर्ड उपलब्ध झाल्यानंतर शिक्षकही अधिक जीव ओतून मुलांना शिकवत आहेत. शिक्षकांच्या या तळमळीची दखल घेत ग्रामपंचायतीनेही शाळेला कंपाउंड, संगणक, प्रिंटर, पोषण आहारासाठी लागणारे साहित्य आणि चाइल्ड थिएटरयुक्त आकर्षक रंगकाम करून देत भरीव मदत केली. या कार्याला मुख्याध्यापक दत्तात्रय कमोदकर यांची साथ लाभत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे नावीन्यपूर्ण उपक्रमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक व आनंददायी अनुभवातून अध्ययनपूरक वातावरण निर्माण करून आनंद देण्याचा नेहमीच प्रयत्न असतो.
- प्रवीण विंचू, उपक्रमशील शिक्षक पिंपळखुटे ३ रे
शाळेचे उपक्रम
जिल्हा परिषद नाशिक व विनोबा यांच्या स्पोकन इंग्लिश स्पर्धेत जिल्ह्यातील 'टॉप ४' शाळांमध्ये निवड. विद्यार्थ्यांची 'विश्वास ९०.८ एफएम रेडिओवर मुलाखत आणि त्याची नोंद 'विनोबा म्हणे' पुस्तकात. स्पेलिंग बी व मॅथ बी स्पर्धांमध्ये तालुका व जिल्हास्तरावर छाप. इंग्रजी साक्षरता व सोप्या वाचनासाठी विशेष उपक्रम. सेल्फी विथ सक्सेस, आनंददायी शनिवार, क्षेत्रभेट, नावीन्यपूर्ण परिपाठ आणि चाइल्ड थिएटर वर्गखोली.