लासलगाव (नाशिक) : राकेश बोरा
गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेला पिंपळगाव निपाणी येथील साखर कारखाना पुन्हा सुरू होणार असल्यामुळे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केजीस शुगर ॲण्ड इन्फ्रा काॅर्पोरेशन लिमिटेड या नावाने हा कारखाना लासलगाव येथील उद्योगपती वेफकोचे अध्यक्ष संजय होळकर यांनी ग्रेनाँच इंडस्ट्रीज या आपल्या उद्योग समूहामार्फत बँकेकडून खरेदी केला असून, यावर्षीपासूनच गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी सुरू आहे.
या कारखान्याच्या माध्यमातून वर्षाकाठी ४०० कोटींची उलाढाल होणार असून, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे एक हजारहून अधिक लोकांना यातून रोजगार मिळणार असल्याची माहिती संजय होळकर आणि सोनिया होळकर यांनी दिली. बंद पडलेल्या साखर कारखान्यामुळे अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी दूरच्या कारखान्यांकडे जात होता. मात्र, आता स्थानिक स्तरावरच गाळपाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
होळकर उद्योग समूहाने दिलेल्या माहितीनुसार, कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर दररोज ३,५०० मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात येईल. आतापर्यंत ४,६०० हेक्टर उसाची नोंदणी झाली असून, आगामी काही दिवसांत ही नोंदणी आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. या कारखान्याच्या माध्यमातून वर्षाकाठी सुमारे ४०० कोटी रुपयांची उलाढाल होईल तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळून सुमारे एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यावेळी कारखान्याचे संचालक सोनिया होळकर, सत्यजित होळकर, धनंजय थिटे, सुरेंद्र सनस, प्रकाश दायमा, एम.डी. आदित्य होळकर, ग्रेनाँच ग्रुपचे मुख्य वित्तीय अधिकारी अजयकुमार खैरनार, कारखान्याचे जनरल मॅनेजर सुकदेव शेटे, माधवराव घोरपडे, निरंजन होळकर, वसंतराव शिंदे, राजेंद्र देसले, मुश्ताक पटेल तसेच कर्मचारी उपस्थित होते.
केजीस शुगर ॲण्ड इन्फ्रा काॅर्पोरेशन लिमिटेड निफाड तालुक्यातील ऊस उत्पादकांना त्यांच्या उसाचा उच्चतम भाव, अचूक मोजमाप आणि त्वरित रोख रक्कम देण्याची हमी देतो. शेतकऱ्यांनी या कारखान्याकडे जास्तीत जास्त ऊसपुरवठा करावा.संजय होळकर, चेअरमन
पिंपळगाव निपाणी साखर कारखाना पुन्हा सुरू होणे म्हणजे निफाड तालुक्यातील ऊस उत्पादकांसाठी दिलासादायक बाब आहे. स्थानिक स्तरावर उत्पादन, प्रक्रिया आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा वेग मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.सोनिया होळकर, संचालक