नाशिक : आपले फोटो कृत्रिम प्रज्ञेला देऊन त्याचे घिबली शैलीत रूपांतर करून ते समाजमाध्यमांवर टाकण्याचा ट्रेंड सध्या लोकप्रिय होत आहे. मात्र, अशी छायाचित्रे ‘एआय’ साधनांना देऊन आपली वैयक्तिक माहिती त्रयस्थांच्या हातात दिल्याने त्यामुळे छायाचित्रांचा दुरुपयोग होऊन व्यक्तीला त्रास, मनस्ताप होण्यासह वैयक्तिक सुरक्षा धोक्यात होण्याचा धोका वाढत आहे, असे तज्ज्ञ सांगत आहेत.
‘घिबली’चे जपानी नाव ‘जिबुली’ असून, या शैलीसाठी वापरकर्ता आपले छायाचित्र ‘एआय’ला देत असतो. त्यानंतर वापरकर्त्यांचे छायाचित्र कार्टूनसारखे घिबली शैलीत तयार करून दिले जाते. हल्ली तरुणाईसह सेलिब्रिटी, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक एआय कडे आपली भारंभार छायाचित्रे देऊन त्यांचे रूपांतरण घिबलीत करताना दिसत आहे. हा ट्रेंड आला असला तरी हे कितपत सुरक्षित आहे, याचा कुणीही विचार करत नाही. त्यामुळे फोटोंचा दुरुपयोग होण्याची शक्यता वाढली आहे. यातून काही नैतिक, बौद्धिक संपदा हक्काचे भंग होणे आदी प्रश्न उपस्थित झाले आहेत. आपली छायाचित्रे आणि इतर माहिती एआयला दिल्यानंतर व्यक्तीच्या सुरक्षेसंबंधीही प्रश्न निर्माण झाले आहेत.
वापरकर्त्याकडून त्याची वैयक्तिक माहिती ‘एआय’ला दिली जाते. त्यामुळे वापरकर्ता कुठे आहे. कुठे राहतो, कुठे जातो, कुठे गेला होता. वापरकर्त्यांच्या कुटुंबात कोण कोण राहते. आपल्या संपर्कात कोणत्या व्यक्ती आहेत. याची माहिती छायाचित्रातून ‘एआय’ मिळत आहे. या माहितीचा दुरुपयोग सहज शक्य असून, यातून समस्यांना आमंत्रण देण्यासारखे आहे, असे मत सायबर जगतातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
घिबली किंवा अन्य एआय आधारित फिल्टर्सचा हल्ली मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. दिलेल्या फोटोद्वारे ‘एआय’ एका आकर्षक कार्टूनमध्ये तो रूपांतरित करतात. यातून खासगी चेहर्याच्या डेटाचा गैरवापर, डिपफेक टेक्नॉलॉजीचा वापर आणि व्यक्तिगत गोपनीयतेचा भंग असे धोके यामुळे निर्माण होत आहेत. त्यामुळे वापरकर्त्याचे चेहर्यांची वैशिष्टे ,भाव, रंग, अभिव्यक्ती यासह अनेक गोष्टी संग्रहित केल्या जातात, ज्या नंतर विकल्या, शेअर केल्या किंवा चुकीच्या हेतूसाठी वापरल्या जाऊ शकतात.तन्मय दीक्षित, सायबर संस्कार तज्ज्ञ, नाशिक.