Water  Pudhari
नाशिक

Water Scarcity | दुष्काळी परिस्थितीत बागलाण तालुक्यातील एकलहरे येथील पाझर तलावातून हजारो लिटर पाण्याची गळती

Water Scarcity | एकलहरे शिवारातील तलावाच्या दुरुस्तीमुळे रब्बी धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

जयखेडा : पुढारी वृत्तसेवा
बागलाण तालुक्यातील तीव्र दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा ठरत असताना जयखेडा येथील एकलहरे शिवारातील (पहिलाड) डुवाच्या पाझर तलावातून दररोज हजारो लिटर पाणी गळतीमुळे वाया जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. देखभालअभावी सांडवा व बांध्याला ठिकठिकाणी गळती लागल्यामुळे तलावातील पाणीसाठा झपाट्याने घटून १० टक्क्यांपेक्षा खाली आला आहे.

त्यामुळे रब्बी हंगामासह परिसरातील शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे.
यंदा अपुऱ्या पावसामुळे बागलाण तालुक्यात विहिरींनी तळ गासला असून खरीप पिके करपली आहेत. अशा परिस्थितीत जुलै महिन्यात पूर्ण क्षमतेने भरलेला हा पाझर तलाव शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण होता.

मात्र, अनेक वर्षांपासून दुरुस्ती व देखभालकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. परिणामी, मौल्यवान पाण्याचा अपव्यय होऊन रब्बी हंगामासाठी आवश्यक असलेला साठा संपण्याच्या मार्गावर आहे. तलावाच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या मार्गावरही पाझरणाऱ्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

तसेच तलावाच्या मातीच्या भरावर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडे - झुडपांमुळे भविष्यात भरावाला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तातडीने झाडे हटवून भराव्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

एकलहरे (पहिलाड) पाझर तलाव एका नजरेत

  • विभाग : जलसंधारण विभाग

  • साठवण क्षमता : अंदाजे १०० ते १५० टीसीएम

  • सध्याची स्थिती : मोठ्या गळतीमुळे पाणीसाठा १० टक्क्यांपेक्षा कमी

  • धोका : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न व भरावाला संभाव्य धोका

  • मागणी : तातडीने दुरुस्ती करून गळती थांबवून रब्बी हंगाम वाचवावा

शेतकरी व अधिकाऱ्यांचे मनोगत

  • राहुल गुंजाळ, कनिष्ठ अभियंता, जलसंधारण विभाग, सटाणा: पाझर तलावाची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर सर्व्हे करण्यात येईल. त्यानंतरचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवून निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. लवकरात लवकर तलावाची दुरुस्ती करण्यात येईल.

  • अरुण खैरनार, शेतकरी, जयखेडा: जुलैमध्ये तलाव पूर्ण भरला होता. मात्र, गळतीमुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करावी.

  • हिरामण खैरनार, शेतकरी, जयखेडा: रब्बीच्या आशेवर कांदा लागवड केली आहे. गळती अशीच सुरू राहिली तर संपूर्ण हंगाम वाया जाईल आणि पाणीटंचाई आणखी तीव्र होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT