Mobile  
नाशिक

Pension information on mobile| निवृत्तिवेतनाची माहिती आता मोबाईलवरच!

'महा-उपलब्धी' अॅपद्वारे पेन्शन तपशील, उत्पन्नाचा दाखला, फॉर्म-१६ साठी मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी निवृत्तिवेतनाशी संबंधित आवश्यक माहिती आता मोबाइलवर सहज उपलब्ध होणार असून, या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या संचालनालय लेखा व कोषागारे, मुंबई तसेच सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग आणि जिल्हा कोषागार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. १०) 'महा-उपलब्धी' मोबाइल ॲपविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या अॅपचा अधिकाधिक निवृत्तिवेतनधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी सचिन धस यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत निवृत्तिवेतनधारकांना अॅपच्या विविध सुविधांची माहिती देण्यात आली. 'महा-उपलब्धी'च्या माध्यमातून मासिक तसेच वार्षिक निवृत्तीवेतनाचा तपशील, उत्पन्नाचा दाखला, फॉर्म-१६ तसेच निवृत्तिवेतनासंदर्भातील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून घेता येणार आहेत. त्यामुळे विविध कागदपत्रे किंवा माहिती मिळविण्यासाठी कार्यालयीन पातळीवर वारंवार पाठपुरावा करण्याची गरज कमी होणार असून, आवश्यक माहिती मोबाइलवरच उपलब्ध होणार आहे.

वरिष्ठ कोषागार अधिकारी सचिन धस यांनी उपस्थितांना अॅपचा वापर कसा करावा, त्यामध्ये निवृत्तिवेतनाचा मासिक व वार्षिक तपशील कसा पाहावा, उत्पन्नाचा दाखला आणि फॉर्म १६ कसा मिळवावा तसेच शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात कसे उपलब्ध करून घ्यावेत, याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

कार्यशाळेस सेवानिवृत्त सहसंचालक वानखेडे, सेवानिवृत्त उपसंचालक महेश बच्छाव, सेवानिवृत्त बाबासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित राजपूत, सहायक संचालक सचिन परदेशी, चैतन्य परदेशी यांच्यासह निवृत्तिवेतन संघटनेचे पदाधिकारी रोहित गांगुर्डे, उत्तमराव गांगुर्डे, मधुकर कांगणे, रमेश जगताप तसेच मोठ्या संख्येने निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारक उपस्थित होते.

अॅपच्या माध्यमातून निवृत्तिवेतनाशी संबंधित आवश्यक माहिती सहज व सुलभ पद्धतीने मोबाइलवर उपलब्ध होणार असल्याने निवृत्तिवेतनधारकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी सचिन धस यांनी आयोजित कार्यशाळेत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT