पवित्र पोर्टल 
नाशिक

पवित्र पोर्टलद्वारे मनपा शाळांत ३६ शिक्षकांची भरती

आजपासून कागदपत्रांची पडताळणी; आठवडाभरात देणार नियुक्तिपत्र

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये ३६ शिक्षकांची भरती करण्यात आली. महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या ३८ जागा रिक्त होत्या. त्यापैकी ३६ जागांवर शिक्षकांची निवड झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. निवड झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी दि. २ व ३ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात पडताळणी करण्यात येणार असून, त्यानंतर आठवडाभरात नियुक्तिपत्रे देण्यात येणार आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विविध व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यासाठी पवित्र पोर्टलचा वापर केला जातो. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, शिक्षक पात्रता परीक्षा तसेच संबंधित निकषांच्या आधारे पात्रता निश्चित करून गुणवत्तेनुसार निवड करण्याची प्रक्रिया या माध्यमातून केली जाते. त्यामुळे शिक्षक भरतीतील मानवी हस्तक्षेप कमी करून प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गुणवत्ताधारित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

नाशिक महापालिकेच्या वतीने शहरात ८८ प्राथमिक आणि १२ माध्यमिक शाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने अध्यापन व्यवस्थेवर ताण निर्माण झाला होता. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालेल्या भरतीमुळे ही कमतरता काही प्रमाणात भरून घणार आहे.

भरतीमध्ये मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांसाठी १५, हिंदी माध्यमाच्या प्राथमिक शाळांसाठी १५ आणि उर्दू माध्यमाच्या माध्यमिक शाळांसाठी सहा शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी शिक्षण विभागाकडून करण्यात येईल.

शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे नाशिक महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ३६ शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षकांना नियुक्तिपत्रे देण्यात येणार असून, त्यांना नियुक्त शाळांमध्ये रुजू करून घेतले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर होऊन विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

- डॉ. मिता चौधरी, प्रशासनाधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT