अपंगत्वावर मात करत सुरगाण्याचा दिलीप गावित पॅरा ऑलिम्पिकमध्ये धावला pudhari photo
नाशिक

Paris Paralympic | अपंगत्वावर मात करत धावला सुरगाण्याचा 'कोहिनूर'

पुढारी वृत्तसेवा

सुरगाणा (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्याच्या गुजरात सीमेलगत असलेल्या लहानशा तोरणडोंगरी या खेडेगावात जन्मलेला कुमार दिलीप महादू गावीत याने अपंगत्वावर मात करत पॅरा ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पॅराऑलिम्पिक मध्ये दिलीप हा अॅथलॅटीक म्हणूक प्रकाश झोतात आला. दिलीप मुळचा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुका येथील आहे.

सुरगाणा तालुक्यातील गृप ग्रामपंचायत अलंगुण मधील तोरणडोंगरी या गावी शेतकरी कुटुंबात दिलीप गावीतचा जन्म झाला. त्याचे आई- वडील शेती व्यवसाय करुन कुटुंबाचा संसार गाडा रेटत आहेत. कुटुंब आणि मुलांचा सांभाळ करत, वडील महादू गावीत आणि आई मोहना गावीत यांनी दिलीप आणि त्याच्या भास्कर, आनंदा, चिंतामण, कमलेश या चार भावांचे पालन पोषण केले. एक किलोमीटर अंतरावर असलेल्या अलंगुण आश्रम शाळा व विद्यालय विभागात मुलांचे शिक्षण केले.

एक हात नसल्याने त्याने निवडली 'रनिंग'

दिलीप हा लहानपणापासून चंचल आणि मेहनती होता, कष्टाळू होता. त्याने पहिली ते सातवीचे प्राथमिक शिक्षण आपल्या गावी जिल्हा परिषद तोरणडोंगरी शाळेत पूर्ण केले. त्यानंतर आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलंगुण या विद्यालयात घेतले. एका हाताने अपंग असल्याने इतर खेळापेक्षा रनिंग स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी त्याने दाखविली, तो मुळातच जिद्दी असल्याने या विद्यालयात शिक्षण घेता घेता शाळेचे क्रीडा शिक्षक रामू चौधरी आणि मनोहर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानावर रनिंगचा नियमित सराव करत होता. सरांचे मार्गदर्शन आणि स्पर्धेचे धडे घेत होता. शालेय क्रीडा विभागाच्या मैदानी स्पर्धांमध्ये स्वखुशीने सहभागी होत होता. मैदानी स्पर्धेसाठी दिलीप ने 200, 400, आणि 800 मीटरच्या इव्हेंट चा सातत्याने सराव केला. शालेय स्तरावरील १७ आणि १९ वर्ष वयोगटाच्या रनिंग स्पर्धेत प्रतिनिधित्वही त्याने केले. अलंगुणच्या शालेय मैदानावर दिलीपने ऊन -वारा पावसात सातत्याने मेहनत घेतल्याने त्याला रनिंग चे बाळकडू या मातीत मिळल्याचे क्रीडा शिक्षक आर डी चौधरी यांनी सांगितले. बारावी नंतर पुढील पदवीधर शिक्षणासाठी पेठ येथील सिनियर कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. त्याने आपल्या ध्येयावर आणि खेळावर लक्ष केंद्रित केले ही त्याच्या यशात जमेची बाजू ठरली आहे.

पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याची चांगली कामगिरी

सिनियर कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर त्याने व्हीकेडी (vkd)अकॅडमी मध्ये पळण्याचा कसून सराव सुरु केला. मार्गदर्शक वैजनाथ काळे यांनी दिलीप गावीत याला रनींग कोच म्हनून महत्वाची जबाबदारी स्वीकारली. त्याच्या परिस्थितीची जाणिव असल्याने सरांनी आर्थिक व इतर सर्व बाबी स्वतः स्विकारून दीलीपच्या सरावावर लक्ष केंद्रित केले. बघता बघता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दीलीपच्या यशाला गवसणी घालण्याचा चंग बांधला. त्यांचे मार्गदर्शन व खेळाच्या डावपेचाने आणि दिलीपच्या सरावाने दिलीप देशातील तसेच फ्रान्स, अमेरिका येथील स्पर्धेत जिद्दीने खेळला. २०२४ च्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याची यशस्वी कामगिरी यशस्वीपणे सुरु आहे.

सर्वत्र त्याचे अभिनंदन 

अपंगत्वावर मात करुन यशाच्या शिखरावर पोहचणाऱ्या दिलीप गावीत याच्या यशस्वी कामगिरीने सबंध आदिवासी समाजाचे, त्याचे, त्याच्या कुटुंबाचे, शाळेचे, महाविद्यालयाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव जगाच्या पाठीवर कोरल्याने, संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार कॉ. जे. पी. गावीत, संचालक मंडळ, क्रीडा शिक्षक, कर्मचारी वृंद सर्वांनी दीलिीपच्या कामगिरीचे अभिनंदन व कौतुक केले आहे. दिलीपचे गाव तोरणडोंगरी, गावातील नागरिक तसेच सुरगाणा तालुक्यातील सर्व विध्यार्थी, युवक, नागरिक बांधव यांनी दीलीपचे अभिनंदन केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT