नाशिक : नाशिकची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या पंचवटी आणि राज्यराणी एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांची गती वाढविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत दिली.
पंचवटी आणि राज्यराणी एक्सप्रेस गाड्यांना सातत्याने होणारा विलंब, स्वच्छतेचा अभाव, पाण्याचा तुटवडा आणि अनारक्षित डब्यांची कमतरता याबाबत संसदेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत खासदार राजाभाऊ वाजे यांनी थेट रेल्वेमंत्र्यांना सवाल केला.
नाशिकचे चाकरमानी, व्यावसायिक, विद्यार्थी, व्यापारी आदींसाठी पंचवटी आणि राज्यराणी एक्सप्रेस या रेल्वे गाड्या जीवनवाहिनी आहेत. मात्र, मागील काही वर्षांच्या राजकीय व प्रशासनिक अनास्थेचा परिणाम म्हणून या रेल्वे गाड्यांची अवस्था बिकट झाली आहे. या रेल्वे गाड्या कधी काळी नाशिकसाठी गौरवाचा भाग होत्या. मात्र, गेल्या काही वर्षात प्रवाश्यांच्या समस्या वाढतच असल्याचे नमूद करत पंचवटी व राज्यराणी एक्सप्रेसला रेल्वे प्रशासनाकडून सापत्नभावाची वागणूक का दिली जाते, असा सवाल खा. वाजे यांनी केला.
या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, या रेल्वे गाड्यांसाठी तात्पुरत्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यात येत आहेत. रेल्वेगाड्यांची स्वच्छता ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. त्यासाठी प्रवासादरम्यान ऑन-बोर्ड हाऊसकिपिंग स्टाफ उपलब्ध करणे, देखभालीवेळी यांत्रिक स्वच्छतेची अंमलबजावणी करणे, नियमित पाण्याचा पुरवठा करणे, सर्व डब्यात बायोटॉयलेट उभारणे आणि ‘रेल मदत’ पोर्टलद्वारे तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करणे आदी बाबी उपलब्ध करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले.
पंचवटी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर सकाळी 9:30 वाजता पोहचलीच पाहिजे याबाबत देखील उपाययोजना करावी, तसेच डब्यांच्या संख्येत आसनव्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी वाजे यांनी केली. यावर उत्तर देताना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या रेल्वेगाड्यांची गती वाढवण्याची प्रक्रिया चालू आहे. यासह सिग्नलिंग, वेग मर्यादा, ट्रॅक ग्रेडियंट, देखभाल बॉक्स यावर देखील काम केले जात असल्याचे सांगितले.