मनमाड (नाशिक) : मनमाड शहर आणि रेल्वेसाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले असून, त्यामुळे पाटोदा साठवण तलावात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. वागदर्डी आणि पाटोदा साठ्यांमधील एकूण जलसाठा पाहता, सध्या मनमाडसाठी ६५ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचा विश्वास नगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई भासू नये, यासाठी पालखेड धरणातून बिगर सिंचनासाठी हे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. १६ दलघफू क्षमतेचा पाटोदा साठवण तलाव लवकरच पूर्ण क्षमतेने भरेल, तर वागदर्डी धरणातही सध्या ५० दलघफू इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे मनमाडकरांना सध्या कोणतीही पाणीटंचाई भासणार नाही.
दरम्यान, मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळेही धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. भविष्यात पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून मनमाड नगरपालिका प्रशासनाने वेळीच पाणीसाठवण व उचल प्रक्रिया सुरू केली आहे. शहराला सध्या १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. वीजपुरवठा अथवा तांत्रिक अडचणी आल्यास काही प्रमाणात व्यत्यय येतो. मात्र, आता पाटोदा आणि वागदर्डीतील पुरेसा साठा लक्षात घेता पाणीटंचाई टळली आहे.
दरम्यान, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी केले आहे.
शनिवारी (दि.7) रोजी रात्री मनमाड शहर व परिसरात मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तब्बल पाऊण तास सुरू असलेल्या या पावसामुळे नागरिकांची आणि दुकानदारांची मोठी तारांबळ उडाली. मे महिन्याभरात अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते, परंतु गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली. रविवारपासून मृग नक्षत्र सुरू झाले असून, ७ जूनपासून अधिकृत पावसाळ्याची सुरुवात होते. यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला असून पुढील काळात चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.