नाशिक : पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातही पाकिस्तानी नागरिकत्व असलेल्या सहा महिला राहत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
भारतात राहणाऱ्या या महिलांकडे दीर्घकालीन व्हिसा असल्याने त्यांना तुर्तास दिलासा मिळाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पर्यटन, वैद्यकीय कारणास्तव आलेल्या नागरिकांना तातडीने भारत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी (दि.२७) या आदेशाची मुदत संपली असून वैद्यकीय व्हिसावर आलेल्या नागरिकांना मंगळवारपर्यंत (दि.२९) मुदतवाढ दिली आहे. मात्र पर्यटन किंवा इतर कारणांनी अल्प कालावधीसाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले.
शहरातही पाकिस्तानी नागरिकत्व असलेल्या सहा महिला अनेक वर्षांपासून राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या महिलांकडे दिर्घकालीन कालावधीचा व्हिसा आहेत. एका महिलेने गत आठवड्यातच दोन वर्षांसाठी व्हिसाची मुदत वाढवल्याचे सुत्रांनी सांगितले. या सहाही महिलांचा विवाह झाला असून त्यांचे सासर नाशिकला असल्याने त्या अनेक वर्षांपासून शहरात वास्तव्यास आहेत. दिर्घकालीन व्हिसाची मुदत असलेल्या नागरिकांबाबत अद्याप ठोस आदेश किंवा सुचना न आल्याने त्यांच्यावर तुर्तास कोणतीही कारवाई होणार नसल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. त्यामुळे शहरातील सहा महिलांना तुर्तास दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.